लोकसभेचे नवे अध्यक्ष म्हणून भाजपचे ओम बिर्ला यांची निवड झाली. त्यांच्या या निवडीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांना त्यांच्या आसनावर नेऊन बसविले. लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दलच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना ओम बिर्ला यांनी काँग्रेस सरकारने लागू केलेल्या आणीबाणीचा उल्लेख करत त्याचा निषेध केला. त्यामुळे कॉंग्रेस खासदारांनी सभागृहात गोंधळ घातला होता. अध्यक्षांच्या निवडीनंतर लोकसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राहुल गांधी यांची निवड झाली. या निवडीनंतर राहुल गांधी यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी आघाडीच्या नेत्यांसह सभापतींची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सपाचे धर्मेंद्र यादव, द्रमुकच्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि तृणमूल काँग्रेसच्या कल्याण बॅनर्जी आदि खासदार उपस्थित होते.
अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या या भेटीची माहिती काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली. ही एक शिष्टाचार बैठक होती. या दरम्यान राहुल गांधी यांनी सभागृहात आणीबाणीचा उल्लेख करण्याचा मुद्दा उपस्थित केला. राहुल गांधी यांनी सभागृहात आणीबाणीचा उल्लेख केल्याबद्दल आक्षेप नोंदवला. हे राजकीय होते आणि ते टाळता आले असते असे राहुल गांधी यांनी अध्यक्षांना सांगितले अशी माहिती त्यांनी दिली.
केसी वेणुगोपाल पुढे म्हणाले, “आम्ही संसदेच्या कामकाजाबाबत अनेक गोष्टींवर चर्चा केली. आणीबाणीचा विषयाची माहिती त्यांनी सभापतींना दिली. हा स्पष्टपणे राजकीय संदर्भ होता. तो टाळता आला असता. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांची सभापतींसोबतची ही पहिलीच भेट होती.