नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने आज संसदेत अर्थसकंल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपतींनी भाजप सरकारच्या साडे चार वर्षातील कामांचं कौतुक करत त्यावर प्रकाश टाकला. भाजपचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यावेळी पतंप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे सर्व मंत्री उपस्थित होते. त्यासोबतच विरोधी पक्ष आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून महिला, क्रीडा, आरोग्य, घर, वीज आणि गरिबी अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी भाष्य केले. सरकारने या सर्व गोष्टींसाठी कोणत्या कोणत्या योजना लागू केल्या आहेत, प्रत्येक योजनेत किती लोकांचा फायदा झाला आहे याची माहिती त्यांनी दिली. स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यामातून आतापर्यंत 9 कोटी शौचालय भारतात निर्माण केले आहेत. तसेच महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या आहेत. मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेकांना व्यवसाय करण्याची संधी सरकारने मिळवून दिली आहे. यासह अनेक महत्त्वाच्या मुद्दायावर राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात मुद्दे मांडले.
राष्ट्रपतींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- स्वच्छ भारत अभियानाच्या अतंर्गत 9 कोटीपेक्षा जास्त शौचालय बांधण्यात आले. यामुळे आज ग्रामीण भागात 98 टक्के स्वच्छता ठेवली जाते.
- आजही अनेक महिलांना चुलीवर जेवण बनवावे लागते त्यामुळे त्यांना अनेक त्रास होतो. यासाठी सरकारने महिलांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी उज्वला योजने अंतर्गत 6 कोटी पेक्षा अधिक गॅस कनेक्शन दिले.
- पंतप्रधान जन आरोग्य अभियानाअंतर्गत 50 कोटी गरीबांसाठी, गंभीर आजारांकरीता प्रतिवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत खर्च केला जाईल. फक्त चार महिन्यात या योजने अंतर्गत 10 लाखांपेक्षा जास्त गरीबांनी उपचार केले आहेत.
- फक्त एक रुपये हप्त्यात पंतप्रधान सुरक्षा वीमा योजना आणि 90 पैसे प्रतिदिनाच्या हप्त्यावर प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेच्या रुपात 21 कोटी गरिबांना विमा सुरक्षा योजना दिली.
- 2014 मध्ये 18 हजार पेक्षा अधिक गावात वीज नव्हती, जिथे गावात वीज नव्हती तिथे आज प्रत्येक गावात वीज पोहचवली आहे. सरकारने दोन करोड 47 लाख घरात वीज कनेक्शन सुरु केले आहे.
- आमच्या मुस्लिम मुलींना भितीच्या आयुष्यातून मुक्त केले आहे. त्या इतर मुलींप्रमाणे सामान्य जीवन जगू शकतात. आम्ही तीन तलाकचा कायदा मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे.
- नवीन तरुणांना आपला व्यवसाय सहज सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या अंतर्गत त्यांनी सात लाख कोरड रुपयांपेक्षा जास्त कर्ज दिले. याचा लाभ घेणारे 15 कोटीपेक्षा जास्त आहेत.
- कामावर जाणाऱ्या महिलांना आपल्या बाळाला सांभाळण्यासाठी योग्य वेळ मिळावा यासाठी मॅटरनिटी लीव्हला 12 आठवड्यावरुन 20 आठवड्यापर्यंत वाढवली आहे.
- 2014 मध्ये 1 जीबी डेटाची किंमत अंदाजे 250 रुपये होती. आता ती कमी होऊन 10-12 रुपयांवर आली आहे. मोबाईलवर बोलण्यासाठी पहिले जेवढा खर्च लागत असे, तो आता लागत नाही.
- काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सरकार चालवत असलेल्या अभियानामध्ये नोटबंदीमुळे खूप मोठा फरक पडला. नोटबंदीने देशातील काळ्या पैशावर प्रहार केला आणि जो काळा पैसा व्यवस्थेच्या बाहेर होता त्याला देशाच्या अर्थव्यवस्थेसोबत जोडला गेला.
- 2014 मध्ये पहिले 3.8 कोटी लोकांनी आपला आयकर रिटर्न फाईल केला होता. मात्र आता 6.8 कोटी पेक्षा अधिक लोक आयकर रिटर्न फाईल करण्यासाठी पुढे आले आहेत.