मुंबई| शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज शिवसेना भवनातून भाजपच्या दबावतंत्रविरोधात तोफा डागल्या. भाजपच्या किरिट सोमय्या यांच्यावर विशेष भर देत संजय राऊत यांनी एकामागून एक पुरावे दाखवत ईडीच्या वसुली एजंटांची नावं जाहीर केली. ईडीच्या माध्यमातून भाजपने महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मागे ईडी (ED) चौकशीचा ससेमिरा लावला आहे, त्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधला. मात्र मी कोणताही गुन्हा, कोणताही गैर व्यवहार केलेला नाही. त्यामुळे असा कोणताही तुरुंग नाही, जो मला दोन वर्षे ठेवू शकेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. ईडीच्या या कारवायांपुढे आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ईडीचे अधिकारी मित्र, नातेवाईकांच्या घरी छापे मारत होते, त्या दिवशी रात्री आपण अमित शाह (Amit Shah) यांना फोन केल्याचा किस्सा संजय राऊत यांनी सांगितला.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत आरोप करताना म्हटले, ‘ईडीचे अधिकारी माझे नातेवाईक, मित्र, मुलगा, मुलगी यांना फोन करून धमकावतात. नातेवाईकांवर, मित्रांवर छापे टाकतात. अरे लहान मुलांनाही धमकावतात. तुमच्या वडिलांना उद्या ईडीच्या चौकशीसाठी जावे लागणार. अटक होणार म्हणून. ज्या दिवशी माझ्या नातेवाईकांच्या घरावर ईडीचे छापे सुरु होते, त्याच दिवशी रात्री मी अमित शाह यांना फोन केला होता. जे सुरु आहे, ते चांगलं नाही म्हटलं. तुमची माझ्याशी दुश्मनी आहे तर मला टॉर्चर करा. पण तुम्ही माझ्या जवळच्या लोकांना टार्गेट करताय हे चुकीचं आहे. ”
ईडीचे अधिकारी चौकशीसाठी कुणालाही कधीही घेऊन जात आहेत, असा आरोप करताना संजय राऊत म्हणाले, त्यांनी एक दिवस 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला पकडून नेलं. मागील अनेक वर्षांपूर्वीच्या एका व्यवहाराची चौकशी करू लगाले. तो म्हणाला, मला खरच काहीच आठवत नाही. तेव्हा ईडीवाल्यांनी त्यांच्यावर दबाव आणला. म्हणाले, तू यहाँ मरेगा, घर नही जाएगा..’ अशी वागणूक देण्याची ही काय पद्धत आहे का, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
ईडीच्या या कारवायांपुढे आम्ही झुकणार नाहीत, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला. ते म्हणाले, ईडीवाले कुणालाही धमकावतात. चौकशीसाठी घेऊन जातात. पण आधी म्हटल्याप्रमाणं हे शिवसेना भवन आहे. साहेबांची प्रेरणा आमच्या मागे आहे. आम्ही आधीही म्हटलं होतं. आता पुन्हा सांगतो. डरेंगे नहीं, झुकेंगे नाही…. महाराष्ट्रात ठाकरे सरकारच राहणार.. तेव्हा हे घाबरवणारे कुठे असतील, ते बघून घेऊ, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
इतर बातम्या-