नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभाराचं भाषण लोकसभेत (PM Narendra Modi speech in Lok Sabha) केलं. यावेळी मोदींनी राम मंदिरापासून, तिहेरी तलाकपर्यंत अनेक विषयांवरुन काँग्रेसला टोले लगावले. पंतप्रधानांचं भाषण सुरु होताच सत्ताधारी खासदारांनी जय श्रीरामची घोषणाबाजी केली. त्याविरोधात विरोधी पक्षांच्या खासदारांनी महात्मा गांधी की जय अशा घोषणा दिल्या. त्यावर काँग्रेस नेते अधीर रंजन यांनी हा तर ट्रेलर आहे असं म्हटलं. त्यावर पंतप्रधान मोदींनी, गांधी तुमचे ट्रेलर असू शकतात, आमचे जीव आहेत, असं म्हणत काँग्रेसला (PM Narendra Modi speech in Lok Sabha) टोला लगावला.
काँग्रेसप्रमाणे जर आम्ही चाललो असतो, तर देशात काहीच बदललं नसतं. जम्मू काश्मीरमधून कलम 370 कधीच हटवलं गेलं नसतं.
काँग्रेसप्रमाणे आमची वाटचाल असती तर शत्रू संपत्ती कायदे बनले नसते, बेनामी संपत्ती कायदा लागू झाला नसता, चीफ ऑफ डिफेन्स नियुक्ती झाली नसती. आमच्या सरकारमुळे कारभाराला गती आली. आमच्या सरकारला गती आणि गुणवत्ता दोन्ही आहे, असं मोदी म्हणाले.
देशातील जनतेने 5 वर्षात विकासाची गती पाहिली, त्यामुळेच आम्हाला आणखी जास्त ताकदीने निवडून दिलं असं मोदींनी नमूद केलं.
लाठ्या खाण्यासाठी पाठ मजबूत
पंतप्रधान मोदींनी यावेळी राहुल गांधींच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राहुल गांधींनी दिल्लीतील सभेत बोलताना, 6 महिन्यांनंतर देशातील तरुण मोदींच्या पाठीवर लाठ्या मारतील, असं म्हटलं होतं. त्याबाबत मोदी म्हणाले, “मी सुद्धा ठरवलं आहे की आता सूर्यनमस्कारांची संख्या वाढवावी. जेणेकरुन माझी पाठ लाठ्या झेलण्यासाठी आणखी मजबूत होईल. गेल्या 20 वर्षांपासून शिव्या-शाप ऐकण्याची सवय झाली आहे. मी 35 मिनिटांपासून बोलत आहे, पण आता करंट बसला. ट्यूबलाईट पेटायला वेळ लागतो” असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवर निशाणा साधला.