वर्धा : लोकसभा निवडणूक अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहेत. सध्या नेतेमंडळी विविध प्रचार सभा घेत विरोधी पक्षांवर हल्लाबोल चढवत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आजपासून सुरु होणाऱ्या या दौऱ्यात मोदी सर्वप्रथम वर्धा येथे भेट देणार आहे. सकाळी 11.30 च्या सुमारास वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान वर्धा दौऱ्यावर असतानाही मोदी मात्र सेवाग्रामला भेट देणार नाहीत.
सध्या राज्यासह देशभरात लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विविध पक्षाचे राजकीय नेते विविध ठिकाणी जाऊन प्रचार करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज एक एप्रिलपासून महाराष्ट्र दौरा सुरु होत आहे. या दौऱ्यात मोदींच्या विविध ठिकाणी आठपेक्षा जास्त सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील पहिली सभा ही वर्ध्यातील स्वावलंबी मैदानात होणार आहे. दरम्यान नरेंद्र मोदी वर्धा येथे असतानाही सेवाग्राम येथील गांधी आश्रमात भेट देणार नाहीत.
याबाबत सेवाग्राम गांधी आश्रमाचे विश्वस्त अविनाश काकडे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना प्रतिक्रिया दिली. “2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मोदींनी सेवाग्राम गांधी आश्रमात बापूंना अभिवादन करत प्रचाराला सुरुवात केली होती. तेव्हा त्यांना गांधीच्या नावाने मतांची गरज होती, आज ते स्वताला मोठे समजतात. तसेच ‘नरेंद्र मोदी गांधी विचारांचे नाहीत, ते असत्य बोलतात, त्यामुळे मोदी सेवाग्राम आश्रमात आले नाहीत हेच बरं, मोदी आश्रमात न येण्याने गांधी विचाराचं संरक्षण होईल.” अशी प्रतिक्रिया सेवाग्राम गांधी आश्रमाचे विश्वस्त अविनाश काकडे यांनी दिली.