बीड : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील राजीव गांधी चौक परिसरात असणाऱ्या हुतात्मा स्मारकाला मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. तत्कालीन फडणवीस सरकारनं केवळ घोषणा केली. मात्र, आम्ही मराठवाड्याच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो आहोत, असं वक्तव्य बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्यावर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी जोरदार टोला लगावला आहे. (Pritam Munde criticizes Dhananjay Munde over Marathwada Development)
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्याचा प्रीतम मुंडे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याकडे मी निव्वळ विनोद म्हणून पाहते. हे वक्तव्य केल्यानंतर पत्रकारांनीही हसायला हवं होतं, असा टोमणा प्रीतम मुंडे यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बीड जिल्हा भाजपकडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना खासदार प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना टोला लगावलाय.
बीडमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आज साजरा करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शहरातील राजीव गांधी चौक परिसरातील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्याचबरोबर पोलीस पोलीस मुख्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणही मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीनं 3 राऊंड फैरी झाडत हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबीनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनीही पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमावेळी स्वातंत्र्यसैनिकांसह विविध मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. दरम्यान अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी खंबीरपणे उभी असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले. तसंच पीक विमा कंपनीला पीकविमा द्या, अशी मागणी करणार असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले.
गेल्या काही दिवसात परळी तालुक्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यात सरासरीपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, बाजरी, तूर, उडीद मूग, फळबागा आदी उभी पिके पाण्याने अक्षरशः नासून गेली आहेत. या काळात शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पूर्णपणे पाठीशी असून झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु आहे. नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, यादृष्टीने संयुक्त पंचनामे व अन्य कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत, असे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी तालुक्यातील अतिवृष्टी पाहणी दौऱ्यादरम्यान म्हटले आहे.
इतर बातम्या :
‘लहानपणी क्रिकेट खेळायचो तेव्हा गावस्कर माझा देव होता’; रोखठोक ट्वीटनंतर आव्हाडांकडून भूमिका स्पष्ट
Pritam Munde criticizes Dhananjay Munde over Marathwada Devlopment