हताश झाल्याने देवेंद्र फडणवीसांकडून फेक व्हिडीओ शेअर : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Dec 18, 2019 | 12:32 PM

माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधीपक्ष नेते म्हणून फडणवीसांनी खोटी माहिती पसरवू नये, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले

हताश झाल्याने देवेंद्र फडणवीसांकडून फेक व्हिडीओ शेअर : पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

मुंबई : हताश झाल्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फेक व्हिडीओ शेअर करत आहेत, असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. फडणवीसांनी ट्विटरवरुन शेअर केलेल्या व्हिडीओवरुन चव्हाणांनी (Prithviraj Chavan on Devendra Fadnavis) त्यांना धारेवर धरलं.

‘माजी मुख्यमंत्री हताश होऊन बनावट व्हिडिओ शेअर करत आहेत, हे पाहून वाईट वाटतं. त्यांनी किंवा त्यांच्या कार्यालयाने व्हिडीओची सत्यता तपासली पाहिजे. माजी गृहमंत्री आणि जबाबदार विरोधीपक्ष नेते म्हणून त्यांनी द्वेषपूर्ण आणि संभाव्य खोटी माहिती पसरवण्यापासून स्वतःला रोखलं पाहिजे’ असं ट्वीट पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

सुधारित नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्या अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील (एएमयू) विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, यामध्ये विद्यार्थ्यांनी हिंदूंच्या विरोधात घोषणा दिल्याचा दावा केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस या व्हिडीओसह दोन व्हिडीओ काल ट्विटरवरुन शेअर केले होते. ‘अशा आंदोलनांना प्रोत्साहन देणे यावरून तडजोडीची किती मोठी परिसीमा तुम्ही गाठली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे !!!’ असं कॅप्शन फडणवीसांनी या व्हिडीओला दिलं होतं.

‘जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणे हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावे !’ असं फडणवीसांनी दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

Prithviraj Chavan on Devendra Fadnavis