मुंबई : “मी इंजिनिअर आहे, त्यामुळं सांगू शकतो ईव्हीएम हॅक करता येत नाही. फारतर फार ईव्हीएम बदलता येऊ शकतात”, असं काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. देशभरात विरोधकांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त करत रान उठवलं आहे. मात्र काँग्रेसचेच दिग्गज नेते असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी ईव्हीएम हॅक करता येत नाही असं सांगून विरोधकांच्या संशयी आरोपातून हवा काढली आहे.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “ईव्हीएम हॅक करता येत नाही, ईव्हीएम फारतर फार बदलता येऊ शकते. मी इंजिनिअर आहे, त्यामुळं सांगू शकतो ईव्हीअम हॅक करता येत नाही.” टीव्ही 9 मराठीशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली.
निवडणूक आयोगातले मतभेद पुढे आले आहेत. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचे एक डिपार्टमेंट झालंय असं काम सुरु आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला.
एक्झिट पोल पोरखेळ
दरम्यान, एक्झिट पोल हा आता पोरखेळ झाला आहे. या सरकारचा निश्चित पराभव होईल.मोदी किंवा एनडीएचा कुठलाही नेता पंतप्रधान होणार नाही. सरकारचे सर्व निर्णय फसलेले आहेत त्यामुळं जनता त्यांना स्वीकारणार नाही, असाही दावा यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
मोदींनी जी पत्रकार परिषद घेतली ती शेवटची पत्रकार परिषद होती, जी एनडीएची बैठक झाली ती सुद्धा शेवटची होती. आताच ते मोदींना निरोप देत आहेत, असा टोमणा पृथ्वीराज चव्हाणांनी एनडीएच्या बैठकीवरुन भाजपला लगावला.
वंचितचा भाजपला फायदा
वंचित बहुजन आघाडीचा निश्चित भाजपला फायदा झाला. त्यांनी आघाडीची मतं मोठ्या प्रमाणात कापली, अशी कबुली पृथ्वीराज चव्हाणांनी दिली.
राज ठाकरेंनी चांगल्या पद्धतीनं मुद्दे मांडल्याने लोकांना मोदींचे चुकीचे निर्णय चांगले दिसून आले. त्यांच्या प्रभावी भाषणांचा चांगला परिणाम दिसला, असं चव्हाण म्हणाले.
कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे राहुल गांधींचे आदेश
दरम्यान, ईव्हीएम बदलले जाण्याच्या शक्यतेने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. “काँग्रेस कार्यकर्त्यांनो, पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. सतर्क राहा. घाबरुन जाऊ नका. तुम्ही सत्यासाठी लढत आहात. खोट्या एक्झिट पोलच्या अपप्रचाराने निराश होऊ नका. स्वत:वर आणि काँग्रेस पक्षावर विश्वासठेवा. तुमची मेहनत वाया जाणार नाही. जय हिंद”, असं ट्विट राहुल गांधींनी केलं.