कोल्हापूर: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्यावर सडकून टीका केली आहे. देशात आणि राज्यात लोकशाही शिल्लक आहे की नाही याबाबत आम्हाला शंका आहे. बेकायदेशीरपणे निर्णय घेतले जात आहेत. लोकशाही धाब्यावर बसवली जात आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे चालली आहे. त्यामुळे उद्या घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तरी फिरवावे लागतील. पण लोकशाही वाचवावी लागेल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हे विधान केलं. अर्थव्यवस्था डबघाईला गेलीय. त्यासाठी कोरोनाचं (corona) कारण दिलं जात आहे. मात्र, त्यात सत्य नाही. कोविडच्या आधीपासून अर्थव्यवस्थेला घरघर लागली होती, असा दावाही त्यांनी केला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने उद्यापासून 15 ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 किलोमीटरपर्यंत यात्रा निघणार आहेत. या यात्रेचा पदपस्पर्श प्रत्येक तालुक्याला होणार आहे. ही यात्रा काँग्रेसने आयोजित केली असली तरी तिरंग्याची आहे. त्यामुळे सर्वांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असं आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
मोदी सरकारने आता पर्यंत भरमसाठ कर्ज काढलं आहे. आता नवीन कर्ज मिळेल असं वाटत नाही. कर वाढवले आहेत पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या संस्था विकल्या जात आहेत. नोटबंदी सुद्धा फसली आहे. अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जातं आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शिवसेनेला संपवून टाकण्याचे संकेत दिले आहेत. या आधी काँग्रेस मुक्त भारतची घोषणा केली होती. चुकून दुसरं सरकार आलं तर लोटस ऑपरेशन केलं जात आहे. अडाणीची संपत्ती किती आणि कशी वाढली हे जगातील आठवं आश्चर्य आहे, असंही ते म्हणाले.
राज्यपालाना काही बंधनं नसते. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी केला. तीन वर्षे विधासभा अध्यक्षांची निवड थांबवणाऱ्या राज्यपालांनी एका रात्रीत अध्यक्ष निवडीला परवानगी दिली. हे सगळं बेकायदेशीर आहे. न्यायालायत हे टिकणार नाही. न्यायालयाचा निर्णय नसल्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार रखडलाय. घेतलेले सगळे निर्णय रद्द करा हे आम्ही कधीच ऐकलं नव्हतं, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.