मुंबई: मुंबईतील काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचं जाहीर केलं आहे. प्रिया दत्त यांनी खासगी कारण देत, लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची इच्छा पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. पिता सुनिल दत्त यांच्या निधनानंतर मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून प्रिया दत्त दोनवेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. मात्र 2014 च्या लोकसभा निवडणुकीत प्रिया दत्त यांचा भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांनी पराभव केला. त्यामुळे आता या मतदारसंघात पूनम महाजन यांच्याविरोधात काँग्रेस कोणता उमेदवार देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर प्रिया दत्त राजकारणापासून दूरच आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सचिव पदावरुनही हटवण्यात आलं होतं. दरम्यान प्रिया दत्त यांनी काँग्रेस सोडणं किंवा राजकीय संन्यास याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही. मात्र आवश्यक तिथे पक्षाचा प्रचार जरुर करेन, असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रिया दत्त यांच्या जागी मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात दुसरा उमेदवार शोधणं काँग्रेससाठी जिकीरीचं आहे. प्रिया दत्त यांची हुकमी जागा म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो. त्यातच आता शिवसेना-भाजपमध्ये तणाव असल्यामुळे काँग्रेसला पुन्हा या मतदारसंघात संधी आहे. पण प्रिया दत्त यांच्याऐवजी काँग्रेस कुणाला मैदानात उतरवणार त्यावर बरंच राजकीय गणित अवलंबून आहे.
महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे. सध्या दोन्ही पक्षांची जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. दोन्ही पक्ष 20-20 जागा लढण्याची शक्यता आहे, तर 8 जागा मित्रपक्षांना सोडण्यात येणार आहेत.