अभिजित पोते, पुणेः राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत वेगवान घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अनुभवी, परखत मत व्यक्त करणारे नेते म्हणून अजित पवार (Ajit Pawar) यांची ओळख आहे. त्यामुळे अनेक घडामोडींमध्ये अजित पवार यांची प्रतिक्रिया महत्त्वाची ठरते. अशा स्थितीत नेत्यांसमोर अनेक कॅमेरे रोखले जावेत आणि संबंधित नेता ते पाहून तडक निघून जावा, हे जरा विचित्रच. पुण्यात नुकतीच अशी घटना घडली. एका बैठकीनिमित्त अजित पवार पुण्यात होते. बैठक संपल्यानंतर ते माध्यमांना प्रतिक्रिया देतील, अशी आशा होती. पण अजित पवार आले, त्यांनी कॅमेरे पाहिले अन् इतक्या झटकन् वेगाने पावलं टाकत तिथून निघून गेले.. त्यांनी कुणाशीही बोलायला नकार दिला.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी हजेरी लावली होती. ही बैठक जवळपास दोन ते अडीच तास चालली. राजकीय वर्तुळात सध्या अनेक वक्तव्य केली जात आहेत. यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रसारमाध्यमांचे कॅमेरे अजित पवारांच्या दिशेने रोखलेले होते.
मात्र बैठक संपल्यानंतर अजितदादा लिफ्टमधून खाली आले. लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा माध्यमांचे कॅमेरे पाहून अजित पवार यांनी चालण्याचा स्पीड एकदम वाढवला. कुणाकडेही न पाहता ते तडक निघाले.
कसबा, चिंचवड पोट निवडणूक तसेच इतर मुद्द्यांवर तुमची प्रतिक्रिया हवी आहे, अशी विनंती माध्यमांच्या प्रतिनिधींनी केली. मात्र अजित दादांनी काहीही प्रतिक्रिया न देता तातडीने ते गाडीत बसून निघून गेले.
२०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या झालेल्या पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तो शपथविधी शरद पवार यांच्या सांगण्यावरून होता की नाही, यावरून पुन्हा एकदा तर्क वितर्क लावले जात आहेत. अजित पवार यांची ती कृती बंड होती की त्याला पवारांची संमती होती, हा अनुत्तरीत प्रश्न आहे. अजित पवार यांनी याआधीही शपथविधीवरून बोलणं टाळलंय. यावेळी त्यांची ही कृतीदेखील ते उत्तर टाळण्यासाठीच होती का, असा प्रश्न विचारला जात आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवेळी नक्की काय चर्चा झाली होती, या चर्चेत काय करार झाले होते, तीनच दिवसात हे सरकार कसं पडलं यासंदर्भात अनेक प्रश्न अडीच वर्षानंतरही अनुत्तरीत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस या प्रश्नांची उत्तरं कधीही बाहेर येऊ देणार नाहीत. ते रहस्य ते कधीच माध्यमांसमोर सांगू शकणार नाहीत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.