मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांना महाराष्ट्रातून जायचंय, म्हणूनच ते वारंवार अशी वक्तव्य करत असतात, अशी शंका घ्यायला जागा आहे… असं वक्तव्य अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलंय. राज्यपालांची (Governor) ही इच्छा असल्याचं सांगण्यासाठी अजित पवारांनी एक किस्साही सांगितला.
मुंबईत आज ते पत्रकारांशी बोलत होते. ज्ञानेश्वर माऊलांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या विचारांतील गोंधळ संपू दे, त्यांना सद्बुद्धी लाभू दे, अशी प्रार्थनाही अजित पवार यांनी केली.
राज्यपाल वारंवार असं का बोलतात आणि सत्तारुढ पक्ष का गप्प बसतात, हे महाराष्ट्राला पडलेलं कोडं आहे. हे सांगताना अजित पवार म्हणाले, ‘ मीसुद्धा उपमुख्यमंत्री असताना, विरोधी पक्षनेता असताना राज्यपलांना बऱ्याचदा भेटलो आहे. ते म्हणायचे… अजितजी बस्स मुझे नही रहना यहाँ… मुझे जाना है..
मी म्हणायचो… वरिष्ठांना सांगा आणि जा.. त्यांना जायचं असेल तर अशी विधानं करत असावेत.. जसं की काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना बदली हवी असली की ते असं काही वेडं वाकडं काम करतात की त्याची बदलीच केली पाहिजे… तसं काही मनात आहे का..अशी शंका राज्यपालांबाबत येते, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला तर या बाबानी वेगळंच सांगितलं.
मी सत्ताधारी पक्षाला बोलतो असं नाही, विरोधी पक्षातले नेते, आमदार, कार्यकर्ते सगळ्यांनीच तारतम्य ठेवून बोललं पाहिजे. पण तशा पद्धतीनं दिसत नाही. ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यपालांच्या विचारांमधला अंधार दूर होऊ दे. वक्तव्यातला गोंधळ संपू दे, महाराष्ट्रातल्या राज्यपालांना सद्बुद्धी दे, अशी प्रार्थना करतो…
शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात सध्या राजकारण तापलं आहे. याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र राज्यपालांनाही महाराष्ट्रातून बाहेर जाण्याची इच्छा असल्याचं मला जाणवल्याचं अजित पवार म्हणालेत.