बारामती, पुणे : सोशल मीडियावर औरंगजेबाचा संदर्भ देऊन आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काल हिंदुत्वावादी संघटनांनी कोल्हापुरात मोर्चा काढला. या मोर्चाला हिंसक वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोल्हापूरमध्ये जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या लौकिकतेला शोभणार नाही. माझ्या राज्यातील सर्वसामान्य जनतेला आणि विशेषता आणि या ठिकाणी या ठिकाणी प्रकार घडले, त्या ठिकाणच्या जनतेला आवहन आहे की, महाराष्ट्र प्रिय राज्य आहे. या सगळ्यात सर्वसामान्य लोकांना कायदा हातात घेण्यासंबंधीची प्रवृत्ती नाही. कुणीतरी काहीतरी करून जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझा आक्षेप आहे, असं शरद पवार म्हणालेत.
याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी हे असं काही न घडेल याची काळजी घ्यावी. शासकीय यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सगळ्यांनी या यंत्रणेला सहकार्य दिलं तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसून येईल, असं शरद पवार म्हणालेत.
कोल्हापूर शहर असो आणि अहमदनगर शहर असो या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक असा अशी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे अशी पार्श्वभूमी अशी असेल तर त्या ठिकाणी शांतता निर्माण झाली पाहिजे. शाहू महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे. माझी खात्री आहे जर कोण चुकीचे वागत असेल तर बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर, राज्य सरकारने सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होईल. त्याला स्थानिकांनी साथ द्यावी, असं शरद पवार म्हणालेत.
23 जूनला विरोधी पक्षाची बैठक होतेय. काल मला नितीश कुमार यांचा फोन आला होता. त्यांच्या राज्यामध्ये देशातील विरोधी पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक बोलावत आहेत. मला त्यांनी निमंत्रित केलं. मी त्या बैठकीला जाणार आहे, असं शरद पवार म्हणालेत.
या निमित्ताने देशासमोरील जे प्रश्न आहेत त्याबद्दल एकत्र येवून भूमिका घेण्याची आवश्यकता दिसते आहे. ती घ्यायची असेल तर विविध राजकीय पक्षांना एकत्र यावच लागेल. सरकारसमोर सामूहिक भूमिका मांडावीच लागेल. त्यासाठी हा जो प्रयत्न आहे त्याला माझा आणि अनेक सहकारी मित्रांचा पूर्ण पाठिंबा आहे, असं शरद पवार म्हणालेत.