पुणेः पुणे (Pune) जिल्ह्यातील भीमा कोरेगाव (Bhima Koregoan) लढाईसंबंधीचा नवा वाद उफाळून आला आहे. पेशवे आणि महार सैनिकांमध्ये झालेल्या लढाईमुळे भीमा कोरेगावला विशेष महत्त्व आहे. 1 जानेवारी 1818 रोजी ही लढाई झाली होती. 1 जानेवारी रोजी लाखो भीमसौनिक या परिसरातील विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी येत असतात. मात्र ही लढाई झालीच नव्हती, केवळ चकमक झाली होती, असा दावा करण्यात आलाय. रोहन मावळदकर (Rohan Mawladkar) यांनी लिहिलेल्या पुस्तकात असा उल्लेख आहे. त्यामुळे मावळदकरांना पुढील 15 दिवस पुण्यात येण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात यांनी केला आहे.
1 जानेवारी 1818 रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे पेशवे आणि महार सैनिकांमध्ये युद्ध झाले होते. या युद्धामध्ये महार सैनिकांचा विजय झाला होता.
या विजयामुळे भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ उभारण्यात आलेला आहे. या विजयस्तंभाला लाखो भीमसैनिक 1 जानेवारीला वंदन करण्यासाठी येत असतात.
परंतु रोहन माळवदकर यांनी या लढाईवर एक पुस्तक लिहिले आहे. यामध्ये त्यांनी भीमा कोरेगाव येथे लढाई झालीच नाही तर त्याऐवजी एक चकमक झाली असे लिहिले आहे.
ही लढाई पेशव्यांमध्ये आणि महारांमध्ये झाली नाही असं लिहिलं आहे, हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे जाणून-बुजून दोन समाजामध्ये या पुस्तकाच्या माध्यमातून भांडणे लावण्याचा प्रयत्न केलेला दिसतोय, असा आरोप सचिन खरात यांनी केला आहे.
त्यामुळे 1 जानेवारीला भीमा कोरेगाव येथे शौर्य दिन साजरा होत आहे. त्या शौर्य दिनाच्या निमित्ताने रोहन माळवदकर यांना 15 दिवस पुणे जिल्हा बंदी करावी, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
रोहन मावळदकर हे पेशाने वकील आहेत. मार्च 2022 मध्येच त्यांनी लिहिलेल्या ‘1 जानेवारी 1818’ या पुस्तकावरून वादंग माजला होता.
रोहन जमादार(मावळदकर ) यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. याविरोधात रोहन यांनी पोलिसात तक्रार दिली होती.
मी हे पुस्तक पुराव्यांच्या आधारेच लिहिले आहे. संबंधित पुरावे पुस्तकात सादर केले असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.