रणजित जाधव, पुणेः कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) विधानसभा पोट निवडणुकांवरून (By Election) पुण्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या या निवडणुकांमध्ये भाजप तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपने एकापेक्षा एक दिग्गज नेते या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची रणनीती आखली आहे. तर महाविकास आघाडीतील घटकपक्षही एकजुटीने कामाला लागले आहेत. यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसे आणि भाजपची जवळीक हा अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय होता. आता पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अपेक्षित निर्णय घेतल्याचं दिसून आलंय. पण राज ठाकरे यांच्या या निर्णयामागे मोठा हेतू असल्याचा आरोप सचिन खरात यांनी केलाय.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी राज ठाकरे यांच्या हेतूवर बोट ठेवलंय. ते म्हणाले, ‘ मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कसबा आणि चिंचवड या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याचे समजतंय. परंतु भारतीय जनता पार्टी ही राज्यांमध्ये जाती-जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये आणि कुटुंबामध्ये भांडण लावण्याचे काम करत आहे. या पार्टीला समर्थन म्हणजे त्यांच्या विचाराचे समर्थन स्पष्टपणे केल्याचे दिसत आहे…
परंतु राज ठाकरे यांनी पक्ष काढून सतरा वर्षे झाले. परंतु आज पर्यंत त्यांना सत्ता मिळाली नाही. आता राज्यामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. म्हणून मुलाला म्हणजे अमित ठाकरे यांना मंत्रीपद मिळण्यासाठी पाठिंबा दिला आहे असे दिसत आहे.
कसबा पेठ आणि चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येण्यासाठी दिग्गज नेत्यांची फौज दाखल झाली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यात ठाण मांडलंय. तर आगामी शिवजयंती निमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही आमंत्रित करण्यात आलंय.
हेमंत रासणे यांच्या उमेदवारीवरून संघाची नाराजी असल्याचं म्हटलं जातंय. मात्र संघ पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे महत्त्वाची बैठक घेत आहेत.
पुण्यातून कसबा पेठ विधानसभा मतदार संघात भाजपविरोधात भूमिका घेत हिंदू महासभा निवडणुकीत उतरली आहे. अध्यक्ष आनंद दवे यांनी उमेदवारी अर्ज भरला असून त्यांनी प्रचाराला धडाक्यात सुरुवात केली आहे.
पुण्यात भाजपने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. रासणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी दिली आहे.