योगेश बोरसे, पुणेः राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) आणि कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात 27 तारखेला ही पोटनिवडणूक (By Poll Election) होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं. तर पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचंही नुकतंच निधन झालं. या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोट निवडणूक घेतली जाणार आहे.
ज्या वेळी एखाद्या आमदाराचं आकस्मिक निधन होतं, त्यावेळी सदर पक्षाद्वारे ही निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी अथवा विनंती केली जाते. या राजकीय परंपरेनुसार, भाजपतर्फेही अशी मागणी करण्यात येईल, असं म्हटलं जातंय. मात्र सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून या दोन्ही जगांसाठी दावेदारी सुरु झाली आहे. त्यामुळे दोन्ही जागांवरील निवडणूक बिनविरोध होईल की चुरशीची निवडणूक होईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
2019 मधील विधानसभा निवडणुकीत कसबा पेठ मतदार संघातून भाजपच्या तिकिटावर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांनी निवडणूक वढवली होती. त्यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव करत निवडणूक जिंकली होती. टिळक यांनी 28हजार मतांनी विजय संपादन केला होता.
पिंपरी चिंचवड मतदार संघात 2019 मध्ये लक्ष्मण जगताप यांनी हॅट्रिक करत विजय संपादन केला होता. मात्र अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी त्यांना कडवी झुंज दिली होती.