पुणे | 12 ऑगस्ट 2023 : पुण्यात आज चांदणी चौकातील उड्डाणपुलाचा उद्घाटन सोहळा पार पडतोय. अशातच भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. ‘असे निष्ठावंतांचे डावललेले जाणे’ असं म्हणत फेसबुकवर त्यांनी पोस्ट शेअर केली. यात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना उद्देशून भाष्य केलं. त्यानंतर आता नितीन गडकरी स्वत: या सगळ्याबाबत पुढाकार घेणार आलाय. नितीन गडकरी हे मेधा कुलकर्णी यांच्या घरी जात भेट घेणार आहेत.
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदचेच्या सभापती नीलम गोऱ्हे, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासह अन्य मंडळी उपस्थित आहेत.
पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर नितीन गडकरी मेधा कुलकर्णीच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. तिथे त्यांच्याशी दीर्घ चर्चा करणार आहेत. मेधा कुलकर्णी यांची बाजू जाणून घेणार आहेत. नितीन गडकरी यांच्यासोबत भेटी झाल्यानंतर मेधा कुलकर्णी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मेधा कुलकर्णी यांनी नाराजी दूर केल्यानंतर नितीन गडकरी आता त्यांची भेट घेणार आहेत. या चर्चेत मेधा कुलकर्णींची नाराजी दूर करण्यात गडकरींना यश येणार का? हे पाहणं महत्वाचं आहे.
मेधा कुलकर्णी यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. यात त्यांनी आपल्याला डावल्यात आलं असल्याचं त्या म्हणाल्या आहेत.
‘असे निष्ठावंतांचे डावललेले जाणे’
माझ्यावरील कुरघोडया, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी.
चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले.
चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय Nitin Gadkari जी आणि Devendra Fadnavis यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरीजी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”.
अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का?
मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही.
साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.
गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.
देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.
माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा घरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करीतच आहे.
त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे.
मेधा कुलकर्णी यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा या सगळ्यावर मी आताच बोलणार नाही. योग्यवेळी भूमिका मांडेन, असं त्या म्हणाल्या.