अभिजित पोते, पुणेः पुण्यातील शनिवार वाडा (Shaniwarwada) परिसरातील दर्ग्याचा वाद पेटण्याची चिन्ह आहेत. येथील दर्गा (Durga) अनधिकृत असून तो गेल्या काही वर्षातच दिसायला लागलाय. त्यामुळे हा दर्गा आधी हटवून टाकण्यात यावा, अशी मागणी हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha) वतीने करण्यात आली आहे. हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी आज टीव्ही 9 शी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. इंग्रजांनी जाताना हे थडगं इथे तयार केल्याचं काही इतिहासकार म्हणतायत, तर ते इथून काढून टाकावं, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.
पुण्यातील शनिवार वाड्याच्या मुख्य दरवाजाला उत्तर दरवाजा म्हटलं जातं. 1233 साली हा दर्गा बांधण्यात आला होता, असं म्हटलं जातं. पण येथील बॅनर्सनुसार हा 1244 साली बांधण्यात आल्याचं दिसून येतंय. पण हा दर्गा अनधिकृत आहे आणि तो पाडण्यात यावा, अशी मागणी हिंदु महासभेने पुरातत्व विभागाकडे केली आहे.
आनंद दवे म्हणाले, शनिवार वाड्याच्या प्रांगणात, पुरातत्व खात्याच्या अंतर्गत हे येतं. हे 20-25 वर्षांपूर्वीचं थडगं आहे. पांडुरंग बलकवडे हे याला 200 वर्षांपूर्वीचा इतिहास असल्याचं सांगतायत. तो विषय वेगळा आहे. पण या दर्ग्याला धार्मिक स्थान नाही. त्यामुळे हे थडगं इथे का असलं पाहिजे, असा प्रश्न हिंदू महासभेने उपस्थित केलाय.
शनिवार वाड्याची जमीन अधिकृत करण्यापासून भूमीपूजन, खर्चानुसार प्रत्येक गोष्टीचा उल्लेख इतिहासात आहे. इथं कोणत्याही दर्ग्याचा उल्लेख नाही. पांडुरंगराव बलकवडे यांनीही असं सांगितलंय. इंग्रजांनी जाताना मुद्दाम इथं हे करून ठेवलंय. मग ते आपण का ठेवायचं? असा सवाल आनंद दवे यांनी केलाय.
22 मे रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यात सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच मनसे सरचिटणीस अजय शिंदे यांनी या दर्ग्याचा विषय काढला होता. पुण्यातील पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी आहेत. काशीतील ज्ञानवापी मंदिराप्रमाणेच पुण्यातही मंदिराच्या जागी मशिदी झाल्या पाहिजेत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.
अजय शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर शनिवार वाडा परिसरातील दर्गा हटवण्यात यावा, ही मागणी जोर धरू लागली. आता हिंदू महासभेच्या भूमिकेनंतर हा वाद उफाळून येण्याची चिन्ह आहेत.