पुणे | 31 जुलै 2023 : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे वरिष्ठ नेते, राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं. तसंच काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना आलेल्या धमकी प्रकरणावर वळसे पाटील यांनी भाष्य केलं. तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भूमिकेवरही दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे.
लोकमान्य टिळक पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात येणार आहे. उद्या पुण्यात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात शरद पवार उपस्थित राहणार आहेत. त्यावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्या लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमाला शरद पवार येत आहेत. मग त्यांचं स्वागतच आहे, असं दिलीप वळसे पाटील म्हणालेत.
शरद पवार हे मोदींच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यावर बोलताना याबाबत मी उत्तर देणार नाही. संबंधित लोकांनी उत्तरं द्यावीत, असं वळसे पाटील म्हणालेत.
मणिपूरच्या घटनेवर मोदी सरकारविरोधात देशातील सर्वच विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. त्यावर प्रत्येक पक्षाची विचारधारा किंवा अजेंडा ठरलेला असतो. त्याप्रमाणे ते त्यांची भूमिका घेतात, असं दिलीप वळसे पाटील म्हणालेत.
संभाजी भिडे यांचं वक्तव्य अतिशय चुकीचं आहे. मी त्याचा निषेध करतो. वारंवार ते जर असं बोलत असतील तर सरकार ने लक्ष घालून योग्य ती कारवाई केली पाहिजे. मी या संदर्भात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भूमिका सांगेल. संभाजी भिडे यांनी एका मर्यादेत राहिलं पाहिजे, असं म्हणत दिलीप वळसे पाटील यांनी संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
संभाजी भिडे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब माहिती आहे, असं वळसे पाटील म्हणालेत.
आजची बैठक व्हीएसआयची परचेस कमिटीची बैठक होती. सहकार क्षेत्रात पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांना मोकळ्या पद्धतीने काम करता आलं पाहिजे. एफआरपी धोरण करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे, असं म्हणत वळसे पाटलांनी पुण्यात झालेल्या बैठकीवर भाष्य केलं आहे.