पुणे | 05 ऑक्टोबर 2023, प्रदीप कापसे : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अत्यंत मोठा दावा केला आहे. अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा जयंत पाटील यांनी केला आहे. अजित पवारांकडे गेलेल्या आमदारासोबत माझी चर्चा झाली. त्यांनी मला त्यांची भूमिका सांगितली आहे. ते म्हणाले की, आम्ही मनापासून आम्ही शरद पवारांसोबत आहोत. आता थोडा दबाव आहे म्हणून आम्ही इकडे राहतोय. पण आतून आम्ही पवारसाहेबांसोबतच आहोत. जे दिसतं तसं नाही. खरी परिस्थिती वेगळी आहे. ते लोक आमच्यासोबत आहेत, असं जयंत पाटील म्हणालेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
आगामी निवडणुकीबाबत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा जयंत पाटील यांनी उत्तर दिलं. महाराष्ट्रातील कोणत्याही लहान मुलांना जरी विचारलं. तरी ती मुलं सांगतात की शरद पवार यांचंच सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. या सरकारचा फक्त सहा महिन्याचा खेळ उरला आहे.लोकसभा निवडणूक झाल्यानंतर परिस्थिती बदलणार आहे. देशात महागाई, बेरीजगारीसारखे मुद्दे आहेत. याकडे सरकारचं लक्ष नाही. मणिपूर हिंसाचारावर हे बोलत नाहीत. या सगळ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष्य करुन मोठ्या पक्षांना तोडण्याचं काम सध्या केलं जातंय, असं जयंत पाटील म्हणालेत.
महाराष्ट्रात लोकांनी ठरवलय भाजपला हटवायचं. पक्ष तोडून आमच्या लोकांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आमच्यावर आरोप केला. आमच्यातले काही लोक तोडून त्यांच्यासोबत नेले. पण जनता आमच्यासोबत आहे. शरद पवारांच्या बाजूने महाराष्ट्रातील 80 % लोकांनी अॅफिडेव्हिट दिलं आहे. 24 राज्यात आमचं संघटन आहे. पक्ष आमचा आहे, असं जयंत पाटील म्हणालेत.
सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्षासंदर्भातत जो निर्णय दिला. त्यात स्पष्ट केलं की, आमदाराच्या पाठीमागे पक्ष जाऊ शकत नाही, पक्ष हा आपल्या जागेवरच असणार आहे. हेच राष्ट्रवादीच्या बाबतीत पण होणार आहे. उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणीत योग्य निर्णय येईल, अशी अपेक्षा करतो, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
जातीनिहाय जनगणन हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे संपूर्ण देशात होणं गरजचे आहे. त्यामुळे मागास जातींना न्याय मिळेल, असं म्हणत जातीय जनगणनेवर जयंत पाटील यांनी भाष्य केलं.