प्रदीप कापसे, पुणेः कसबा पेठ (Kasba Peth) विधानसभा पोट निवडणुकीत (By Election) भाजपच्या (BJP) निर्णयावरून राजकीय वातावरण तापलंय. महाविकास आघाडीचा उमेदवार आज अर्ज भरणार असल्याचं कळतंय. त्यातच या रणसंग्रामात आता आणखी एक भिडू उतरणार असल्याची माहिती हाती आली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांची यासंदर्भात गांभीर्याने चर्चा झाल्याचं कळतंय. रविवारी रात्रभर वंचितच्या नेत्यांमध्ये खलबतं झाल्याचं समजतंय. कसबा पेठेच्या पोटनिवडणुकीसंदर्भात प्रकाश आंबेडकर आज पक्षाची भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या संभाव्य उमेदवाराला रात्रीतून फोन गेल्याचीही माहिती हाती आली आहे. निवडणूक लढवण्याची तयारी आहे का, असेही विचारण्यात आले आहे. आज दुपारी वंचितच्या राज्य पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कसब्याच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा पेठ विधानसभा मतदार संघात पोट निवडणूक होत आहे. टिळक यांचे पती शैलेश टिळक निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्याने टिळक यांच्यासह अनेकजण नाराज असल्याची चर्चा आहे.
भाजपाने हेमंत रासणे यांना उमेदवारी दिली आहे. आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठीआल्या होत्या. अखेरपर्यंत त्यांनी पक्षासाठी काम केले. उमेदवारी देताना पक्षाने त्यांच्यावर अन्याय केल्याची भावना टिळक यांनी बोलून दाखवली आहे.
हेमंत रासणे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. भाज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेही यावेळी उपस्थित राहतील.भाजप कार्यकर्ते या प्रसंगी मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहेत.
कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचं निश्चित झालंय. धंगेकर आज उनेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे.
विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. आता पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकदेखील भाजपासाठी सोपी नसल्याचं दिसतंय. मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्यला उमेदावारी न दिल्याने अनेकजण नाराज आहेत. आज पुण्यात भाजपविरोधात बॅनर्स झळकले आहेत. ब्राह्मण समाज भाजपावर नाराज असल्याचं यातून दिसून येतंय.