दगडूशेठ गणपतीची आरती, जोरदार शक्तिप्रदर्शन, भाजप-मविआने अर्ज भरला, पण चर्चा नाराजीची… पुण्यात काय घडतंय?

| Updated on: Feb 06, 2023 | 12:41 PM

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी घरातीलच व्यक्ती म्हणजे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक निवडणुकीसाठी इच्छुक होते.

दगडूशेठ गणपतीची आरती, जोरदार शक्तिप्रदर्शन, भाजप-मविआने अर्ज भरला, पण चर्चा नाराजीची... पुण्यात काय घडतंय?
Follow us on

पुणेः राज्याचं लक्ष लागलेल्या कसबा पेठ (Kasba Peth) आणि चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकीत आज मोठ्या घडमोडी घडत आहे. एकिकडे या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे भाजप (BJP) आणि महाविकास आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारांच्या निवडणुकीचा अर्ज भरला. आधी भाजप पदाधिकाऱ्यांनी दगडूशेठ गणपतीची आरती केली आणि नंतर हेमंत रासणे यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी चर्चा होती ती शैलेश टिळक यांच्या नाराजीची.

शैलेश टिळक गैरहजर

भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोट निवडणूक जाहीर झाली आहे. या ठिकाणी घरातीलच व्यक्ती म्हणजे मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र भाजपने टिळक यांना उमेदवारी नाकारून हेमंत रासणे यांना तिकिट दिले. त्यामुळे कसबा पेठेत टिळक कुटुंबीय भाजपवर नाराज असल्याची चर्चा आहे.

भाजपने जोरदार शक्ति प्रदर्शन केलं. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे यावेळी उपस्थित होते. मात्र शैलेश टिळकांची गैरहजेरी ही जास्त बोलत होती. टिळक कुटुंबीयांची नाराजी भाजपाला भोवणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनीही केलंय.

मविआचंही शक्तिप्रदर्शन..

भाजपप्रमाणेच महाविकास आघाडीनेही दगडूशेठ गणपतीची आरती करूनच उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना कसब्यातून तिकिट देण्यात आलंय. रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला त्यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण यांची उपस्थिती होती.

स्वतःला राजा बनवून जनतेची पिळवणूक करण्याचं काम भाजप करतेय, सत्तेचा दुरुपयोग करतेय. त्यामुळे लोकशाही पद्धतीनेच जनता हुकुमशाहीचा बिमोड करणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

चिंचवडमध्येही अर्ज भरले

तर भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजप-मविआ उमेदवारांनी आज अर्ज भरला. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल कलाटे हेदेखील आज उमेदवारी अर्ज भरतील.

बिनविरोधसाठी भाजपाचे प्रयत्न?

कसबा आणि चिंचवडमधील निवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. तर अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव भाजपकडून आला नसल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

नाना पटोलेंना असं वाटत असेल तर मी स्वतः त्यांना फोन करेन, त्यांना भेटायला जाईन, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

राज ठाकरेंचाही आग्रह

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निवडणुका बिनविरोध होण्यासाठी आग्रह धरला आहे. यासंदर्भातील पत्र त्यांनी राज ठाकरेंनी पाठवलं आहे. यावर आता महाविकास आघाडी काय निर्णय घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.