प्रदीप कापसे, पुणेः कसबा पेठ (Kasba Peth) आणि पिंपरी चिंचवड (Chinchwad) पोट निवडणुकांवरून राज्याचं राजकारण तापलेलं आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमेदवार विरोधात भाजप अशी तगडी फाईट येथे दिसून येणार आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उफाळून आलेल्या बंडखोरीमुळेही या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. राज्यात भाजप आणि मनसे युतीच्या चर्चा जोर धरत असताना पुण्यातील या पोट निवडणुकांमध्ये मनसे कुणाच्या बाजूने असणार, असा प्रश्न विचारला जातोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात महत्त्वाचे आदेश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज ठाकरे रविवार आणि सोमवारी पुणे दौऱ्यावर. यावेळी त्यांनी कार्यकर्तांशी संवाद साधला. पुण्यातील पोट निवडणुकांमध्ये माझे पुढील आदेश येईपर्यंत कुणीही प्रचारात सहभागी होऊ नका, अशा सूचना राज ठाकरे यांनी दिल्या आहेत.
राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात सूचना दिल्या आहेत. राज ठाकरेंचा आदेश येईपर्यंत कसबा पोटनिवडणुकीतील प्रचारात कोणीही सहभागी होऊ नका. पदाधिकारी प्रचारात आढळून आल्यास मनसेकडून कारवाई केली जाणार अशा पक्षांतर्गत सूचना मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत..
राज ठाकरे कसबा पोटनिवडणुकीत तटस्थ भूमिका घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळेच भाजपा किंवा महाविकास आघाडी अथवा इतर अपक्ष अशा कुणाच्याही प्रचारात सहभागी होऊ नका, असे पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत.
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा पेठ येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजपाच्या हेमंत रासणे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे. तर रासणे यांच्याविरोधात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड मतदार संघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणूक होत आहे. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांना येथून महाविकास आघाडीचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे.
कसबा आणि चिंचवड येथील पोट निवडणुका बिनविरोध होण्याचा आग्रह भाजपतर्फे केला जात आहे. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच शिवसेना पक्षाकडून ही संमती मिळण्याची शक्यता फार कमी आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी आतापर्यंत दिलेल्या प्रतिक्रियांमधून सध्या तरी हेच चित्र आहे. विधान परिषद निवडणुकांच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील पक्षांना उभारी मिळाल्याचं दिसंतय. त्यामुळेच भाजपला पराभवाची भीती वाटतेय, असी वक्तव्ये मविआकडून येत आहेत.
7 फेब्रुवारी ही उमेदावरी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. आज 8फेब्रुवारी रोजी अर्जांची छाननी होईल. तर 10 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.