प्रदीप कापसे, पुणेः प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीची उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेशी युती झाली. मात्र वंचित हा पक्ष महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) शामिल होणार की नाही, यावरून साशंकता आहे. प्रकाश आंबेडकरांनी हिरवा कंदिल दाखवला आहे. राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाकडून अद्याप हातमिळवणी झालेली नाही. त्यामुळे वंचितची मैत्री शिवसेनेपुरती राहते की, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र नुकत्याच घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर प्रकाश आंबेडकर यांनी मविआच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसून आलंय. कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र उमेदवार देणार, अशी चर्चा होती. मात्र या दोन्ही ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला नाही.
पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड विधानसभा पोट निवडणुकीसाठी महाविकास आघाडी ठाकरे गटाला संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्चित झाली. वंचित आणि ठाकरे गटाची युती झाल्याने वंचित बहुजन आघाडीने या ठिकाणी उमेदवार दिला नाही. तसेच निवडणुकीत उमेदवार उभा करण्यावरून ठाकरे आणि आंबेडकर यांच्यात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे यांच्या सांगण्यावरून वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष मदत करणार असल्याचं समोर आलंय. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने दोन्ही ठिकाणी उमेदवार दिलेले नाहीत.
भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीतर्फे या ठिकाणी काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपतर्फे हेमंत रासणे यांना तिकिट देण्यात आलंय.
पिंपरी चिंचवड मतदार संघाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे येथे पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर मविआतर्फे येथे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार उभा केला आहे. राष्ट्रवादीने येथे नाना काटे यांना तिकिट दिले आहे. मात्र राष्ट्रवादीचे इच्छुक राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. राहुल कलाटे यांची नाराजी दूर करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे. सध्या तरी येथे भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे असा तिरंगी सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.