भाजपाला धूळ चारणारे रवींद्र धंगेकर आज मुंबईत, राज ठाकरेंनाही भेटणार? ‘त्या’ पाठिंब्याबद्दल आभार मानणार?

| Updated on: Mar 08, 2023 | 10:19 AM

रवींद्र धंगेकर आज मुंबईत महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यात महाविकास आघाडीचे नेते तर आहेतच पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीलाही ते जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धंगेकर शिवतीर्थावरही जाण्याची शक्यता आहे.

भाजपाला धूळ चारणारे रवींद्र धंगेकर आज मुंबईत, राज ठाकरेंनाही भेटणार? त्या पाठिंब्याबद्दल आभार मानणार?
Image Credit source: social media
Follow us on

प्रदीप कापसे, पुणे | कसबा पोट निवडणुकीत भाजपाचे उमेदवार हेमंत रासणे (Hemant Rasne) यांना धूळ चारणारे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) सध्या चर्चेत आहेत. धंगेकर यांच्या नावाची एक लाटच पुण्यात होती, हे खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीच मान्य केलं. कसबा पेठेत भाजपची २८ वर्षांपासूनची सत्ता उलथवून देण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळे महाविकास आघाडीलाही मोठं बळ मिळालंय. राज्यात याच पॅटर्नने निवडणुका लढवल्या तर भाजपसमोर मोठ्या अडचणी निर्माण होतील, असे आडाखे मविआकडून बांधले जात आहेत. तशी मोटबांधणीही सुरु झाली आहे. तर कसबा विधानसभेचे नवे आमदार रवींद्र धंगेकर त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सज्ज झाले आहेत. धंगेकर आज मुंबईत महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यात महाविकास आघाडीचे नेते तर आहेतच पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीलाही ते जाणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धंगेकर शिवतीर्थावरही जाण्याची शक्यता आहे.

उद्या शपथविधी

पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड मतदार संघातील नवनिर्वाचित आमदारांचा उद्या शपथविधी पार पडणार आहे. त्यासाठी कसब्याचे रवींद्र धंगेकर आणि चिंचवडच्या भाजप आमदार अश्विनी जगताप या मुंबईत दाखल होणार आहेत. धंगेकर आजच मुंबईत येणार असून ते मविआतील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

ठाकरे, अजित पवार, पटोलेंना भेटणार

महाविकास आघाडीतील शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट रवींद्र धंगेकर घेतील. अत्यंत गाजलेल्या कसबा पेठ निवडणुकांमुळे महाविकास आघाडीला चांगलंच बळ मिळालंय. कसब्यातील निवडणुकीनंतर आगामी महापालिका तसेच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने या भेटीत काही महत्त्वाचे मुद्दे चर्चेला येण्याची शक्यता आहे.

शिवतीर्थावरील भेटीकडे लक्ष…

रवींद्र धंगेकर मविआकडून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र धंगेकर हे आधी 10 वर्षे शिवसेनेत आणि त्यानंतर मनसेत कार्यरत होते. मनसेत असताना ते राज ठाकरे यांच्या जवळचे नेते होते. पुण्यात कसबा पेठेत रवींद्र धंगेकर यांना झालेल्या मतदानातही मनसेचा छुपा पाठिंबा होता, असे म्हटले जात आहे. कसबा पेठेत विजयी झाल्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी अगदी टिळकांसह सर्वच महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या. इतकच काय भाजप्या गिरीश महाजनांचीही भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर आज ते राज ठाकरे यांच्याही भेटीला जाणार असल्याची दाट शक्यता आहे. धंगेकर आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमकं काय घडतंय, याकडे सर्वांचं लक्ष लागंलय .