पुणे : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुण्यात जाऊन महापौर शिवसेनेचाच होईल असं भाष्य केलं असताना, आता पुण्यात वेगळीच समीकरणं घडताना दिसत आहेत. पुणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची महापालिका निवडणूक आघाडी संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या युतीबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित महापालिका निवडणूक लढणार याची चर्चा सकारात्मक झाली. शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे 40 ते 45 जागांची अपेक्षा व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे पुण्यात ठाकरे – पवार पटर्न अस्तित्वात येणार का याबाबत उत्सुकता लागली आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची काल गोपनीय बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेत भाजपला रोखण्यासाठी शिवसेना – राष्ट्रवादीची व्यूहरचना आखण्यात आली. पुढच्या बैठकीत जागा वाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे.
भाजप – 99
राष्ट्रवादी – 42
काँग्रेस – 10
सेना – 10
मनसे – 2
एमआयएम – 1
एकूण जागा – 164
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ, असे सूचक वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकर यांनी केले होते. महापालिका निवडणुकीत मनसे ‘एकला चलो रे’ असणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे यांनी फार बोलण्याचे टाळले. त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घेऊ, असे मोघम वक्तव्य त्यांनी केले. म्हटलं तर महापालिका निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कार्यालयाची गरज होती म्हणून नवं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजून निवडणुकांना वेळ आहे. सर्वच निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. शेड्युलप्रमाणे फेब्रुवारीत निवडणुका व्हायला पाहिजे, पण पुढे काय होईल माहीत नाही, असं सांगतानाच निवडणुकीची रणनीती काय असेल हे तुम्हाला का सांगू?, असा सवाल त्यांनी एका प्रश्नावर उत्तर देताना केला होता.
संबंधित बातम्या:
वर सत्तेत एकत्र असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही; विजय शिवतारेंची जाहीर कबुली
अजित पवारांना सांगू आमचे ऐका नाही तर आज मुख्यमंत्री दिल्लीला गेलेच आहेत, राऊतांचं थेट आव्हान?