पुणे : राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहायला आता सुरुवात झालीय. पुणे महापालिकेसाठी सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे नेते कामाला लागल्याचं दिसून येत आहे. बैठका आणि मेळाव्याचं सत्र सुरु झालंय. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठी घोषणा केलीय. पुण्यात पुढचा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचाच असणार. अजितदादांच्या नेतृत्वात निवडणूक जिंकू. निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेशच सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिलाय. (MP Supriya Sule orders party workers to start preparations for Pune Municipal Corporation elections)
राष्ट्रवादी काँग्रेसचा नोकरी मेळावा आज पुण्यात घेण्यात आला. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. पत्रकार सांगतात की पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं, पण महापौरांकडून चांगलं काम झालं नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असं लोक सांगत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असा आदेशच सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय.
सुप्रिया सुळे यांनी यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही कौतुक केलं. रुपाली आजकाल टीव्हीवर जास्त दिसतात. अजितदादांनी त्यांच्यावर विश्वासानं जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक महिलेला न्याय देण्याचं काम त्या करतील. प्रत्येक महिलेला महिला आयोगा हे आपलं माहेर वाटलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आंदोलनाची घोषणा केलीय. भाऊबीजेच्या दिवशी महिला आंदोलन करणार आहेत. सिलिंडचे दर कमी करुन भाऊबीज द्या, अशी मागणी सुळे यांनी केंद्र सरकारकडे केलीय.
आर्यन खानने ड्रग्स घेतलं नाही तर मग 25 दिवस आत का बसवलं? आई म्हणून वाईट वाटतं. शाहरुख खान हा महाराष्ट्रापुरता किंवा देशापुरता नाही तर आंतरराष्ट्रीय कलाकार आहे. त्यामुळे अशा प्रकारामुळे भारताचंही नाव खराब होतं. चूक नसताना अधिकारी कारवाई करत असेल तर ते चुकीचं आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका करताना अशी माणसं आमच्या खिशात असतात, असं म्हटलं होतं. त्यावरुन नवाब मलिक यांनीही प्रत्युत्तर दिलंय. तर सुप्रिया सुळे यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावलाय. आमच्यावर यशवंतराव चव्हाण यांचे संस्कार आहेत. आमच्या तोंडी अशी भाषा नसते. अशी भाषा आमच्या वाचनातही नसते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
इतर बातम्या :
परमबीर सिंह कुठे गायब झाले? पोलिस आणि सरकारला पडलेल्या प्रश्नांचं संजय निरुपमांनी दिलं उत्तर!
MP Supriya Sule orders party workers to start preparations for Pune Municipal Corporation elections