पुणे : राष्ट्रवादीचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली आहे. “ज्याच्या तोंडात 24 तास विष असतं तो विषारीच बोलणार. शरद पवार आणि कुटुंबीयांनाविषयी बोलण्यासाठी काही सुपारी बहाद्दर भाजपमध्ये आहेत. त्यातील हा एक सुपारी बहाद्दर आहे. याला सांगितलं आहे की, फक्त पवार कुटुंबीयांविषयी बोलायचं म्हणजे तुला कॅबिनेट मंत्रिपद मिळेल. याला एवढं ज्ञान नाही की कॅबिनेट मंत्रिपदीवर्णी लागण्यासाठी ज्ञान आवश्यक असतं. त्यामुळे आपला आवाका किती आपण बोलतो किती हे एकदा तपासलं पाहिजे”, असं अमोल मिटकरी म्हणालेत.
कितीही विष ओकण्याचा प्रयत्न केला तरी विष ओकणाऱ्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही. भाजपमध्ये एवढी तरी आचारसंहिता किंवा लाज-शरम असेल तर अशा लोकांना ते स्थान देणार नाहीत. भाजपमध्ये स्पर्धा लागलेली आहे की कोण जास्त खालच्या पातळीवर बोलणार, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.
पुण्यातील वाघोलीच्या वाघेश्वर मंदिरात ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. तोकडे कपडे घालून आल्यास मंदिरात प्रवेश मिळणार नाही.वाघेश्वर देवस्थान ट्रस्टकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून राज्यातील मंदिरात ड्रेसकोड जाहीर करण्यात आला आहे. यावरही अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ड्रेस कोड संदर्भात हा निर्णय फक्त भाविकांसाठी आहे का पुजारांसाठी आहे, हे मंदीर संस्थानने स्पष्ट करावं. नागरिकांनी अर्धवट कपड्यात मंदिरात जाऊ नये, असं ते सांगत असतील तर पुजाऱ्यांनी देखील अर्धवट कपड्यात मंदिरात जाऊ नये. संविधानाच्या नियमानुसार नियमावली सर्वांना सारखीच पाहिजे. त्यामध्ये महत्त्वाचे विषय बाजूला राहतात आणि असले विषय समोर येतात, असं मिटकरी म्हणाले आहेत.
नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यातील वादावरही मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे आणि संजय राऊत यांच्यामधील वाद जो आहे तो अंतर्गत वाद आहे. ते एकमेकांवर टीका टिपणी करत असतात. आता कोणी खालच्या पातळीवर बोलत असेल तर तो जिथे असेल तर समोरचा त्याच्या पातळीवर जाऊन बोलतो, असं मिटकरी म्हणालेत.
पुणे लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवारांनी आजच सांगितलं आहे. ज्यांची जास्त ताकद ते त्या ठिकाणी निवडणूक लढतील. जर पुणे लोकसभा मतदारसंघात जर काँग्रेसची ताकद असेल आणि काँग्रेसचा दावा असेल तर तो तिढा महाविकास आघाडीने एकत्र येऊन निर्णय घ्यावा, असं म्हणत मिटकरी यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर भाष्य केलंय.