पुणे | देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुणे दौऱ्यावर होते. अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याचा आजचा (6 ऑगस्ट) दुसरा दिवस होता. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर अमित शाह हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात आले होते. या दौऱ्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अजित पवार यांच्या पाठोपाठ आता जयंत पाटील हे सुद्धा शरद पवार यांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. या सर्व चर्चांवर जयंत पाटील यांनी मी अमित शाह यांना भेटलो नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर आता शाह-पाटील भेटीच्या चर्चांबाबत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय.
अमित शाह आणि जयंत पाटील यांच्यात कुठलीही भेट झाली नसल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. काही लोकांना अफवा उडवायला आवडतं, असं म्हणत फडणवीस यांनी खिल्ली उडवली. शाह पाटील यांच्या भेटीच्या फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“काही लोकांना अफवा उठवायला खूप आवडतं. किमान माध्यमांनी खात्री करुन बातम्या दिल्या पाहिजेत. जयंत पाटील यांची कुठलीही भेट अमित शाह यांच्याशी झालेली नाही. जे पतंगबाजी करतायेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी स्तर ठेवावा. तसेच कन्फर्मेशन करुनच अशा बातम्या द्या”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.