योगेश बोरसे, प्रतिनिधी- पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : अजित पवार गटाने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राष्ट्रवादीतील दिग्गज नेते त्यांच्यासोबत गेले. राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते अजित पवार यांच्यासोबत जात सत्तेत सहभागी झाले. तेव्हा काही नेते शरद पवार यांच्याचसोबत राहण्यावर ठाम होते. त्यातलंच एक नाव म्हणजे राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील. जयंत पाटील हे अजित पवार गटात सामील होतील, असा दावा करण्यात आला आहे. जयंत पाटील हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्यापैकीच काही जणं आमच्याकडे लवकरच येतील. जयंत पाटीलही आमच्याकडे येतील, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे, असं मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे. त्यांनी निवडूक आयोगासमोर सुरु असलेल्या सुनावणीवरही प्रतिक्रिया दिली आहे.
अजितदादा पवार हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत आमदारांचं संख्याबळ आहे. जिल्हा अध्यक्ष आहेत. चिन्ह मिळायला आम्हाला काही हरकत नाही. निवडणूक आयोग निष्पक्षपने काम करतं. तरुण पुढे येत आहेत. मोठ्यांचे आशीर्वाद मिळावेत. अजित दादा फक्त विकासकामांसाठी पुढे आले आहेत. 100 टक्के पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे राहील, असा विश्वासही धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला आहे.
छगन भुजबळ आणि वरिष्ठ पातळीवर असलेल्या नेत्यांमध्ये काय चर्चा झाली माहिती नाही. पण अजितदादांनी शपथ घेतली. तेव्हा त्यांना आशीर्वाद असणारच, असं म्हणत धर्मरावबाबा आत्राम यांनी छगन भुजबळांच्या टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीतील दाव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मागच्या वर्षभरापासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यावरही धर्मरावबाबा आत्राम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच मंत्री मंडळ विस्तार होईल. नवरात्रीच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, असं धर्मरावबाबा आत्राम यांनी म्हटलं आहे.
सणासुदीचे दिवस आहेत. त्यामुळे जे ड्रग्स पुण्यात येत आहेत. त्यावर कारवाई केली जाईल. चार महिने धाड मोहीम राबवली जाईल. भेसळ युक्त तूप, पनीर याच्यावर कारवाई केली जाईल. त्यासाठी भरारी पथकंही तयार करणार आहोत, असंही ते म्हणाले.