पुणे : देवेंद्र फडणवीस… महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असं नाव जे विरोधात असो की सत्तेत पण त्यांच्या नावापुढे मुख्यमंत्री शब्द लागावा, अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा असते. सध्या ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पण त्यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र केंद्रातही फडणवीस चांगलं काम करू शकतील असा विश्वास त्यांच्या समर्थकांना वाटतो. त्यामुळे आता भावी मुख्यमंत्री नको, तर भावी पंतप्रधान, असं फडणवीसांना म्हणायला हवं, असं एका कार्यक्रमात म्हणण्यात आलं. तेव्हा फडणवीसांनी दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.
पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेच्या नव्या इमारतीच्या शुभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मॉडर्न कॉलेजच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. शिवाजीनगरमधल्या मॉडेल कॉलेजमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला.
मॉडर्न कॉलेजच्या या कार्यक्मात देवेंद्रजी आता भावी मुख्यमंत्री नको भावी पाच आकडी शब्द! भावी पंतप्रधान, असं कार्यक्रमाचे आयोजन, मॉडर्न कॉलेजचे अध्यक्ष गजानन एकबोटे म्हणाले. त्यावर मान डोलावत देवेंद्र फडणवीस यांनी नको म्हणत हात जोडले. या प्रसंगाची पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देशात कोण? असा प्रश्न विचारला तर आता तुम्हीच दिसता… तुम्ही कितीही नाही म्हटले तरी टाळ्या बघा किती वाजवताहेत, असं एकबोटे म्हणाले. त्यावरही देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा नाही म्हणत हात जोडले.
पुढे या कार्यक्रमात पुढे देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थितांना संबोधित केलं. आम्ही नवीन शिक्षण धोरण आणलं आहे.येत्या काळात आपल्या शिक्षण पद्धतीत झपाट्याने बदल होणार आहेत. विसाव्या शतकात प्रश्न होता तो आपल्या स्वात्रंत्र्याचा पण 21 व्या शतकात आपल्यावर फक्त कायद्याची बंधने आहेत. आज तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे. शिक्षण क्षेत्रात काळानुसार बदल करावा लागेल, असं फडणवीस म्हणाले.
पुढच्या 12 वर्षात आजच्या पेक्षा दुप्पट विद्यार्थी असतील. जग वेगाने बदलत आहे. सगळे उद्योग बदलत आहेत. वेगाने होणाऱ्या बदलांना स्विकारावं. आपलसं करावं लागेल आणि तसं मनुष्यबळ देखील आपल्याला तयार करावं लागेल, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटील देखील या कार्यक्रमात होते. सरकार चलवताना विकास कामात जी गती आणि स्पीड हवं हवे ती आशा कॉलेजमधून मिळते. राज्यात अनेक नवी महाविद्यालयं बनत आहेत. नवीन शिक्षण धोरण आणलं असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरु होई, असं ते म्हणाले.