अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला आहे. कंत्राटी भरतीचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावर रोहित पवार बरसले. अजितदादा आमच्या सरकारच्या काळातही उपमुख्यमंत्री होते. दादा तिथं असते तर त्यांनी त्यांना लगेच सांगितलं असतं की देवेंद्र फडणवीस तुम्ही खोटं बोलत आहात. ते आमच्या नेत्यांना माफी मागयला लावत आहेत. देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. पण ते आता खोटं जास्त बोलत आहेत, असा घणाघात रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांच्या नेतृत्वात युवा संघर्ष यात्रा काढली जात आहे. त्यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं. युवा संघर्ष यात्रेला यश येताना दिसत आहे. सरकारने देखील याची दखल घेतली आहे. कंत्राटी नोकर भरतीचा जीआर रद्द केला आहे. पोलिसांकडून या यात्रेची माहिती घेण्यात आली आहे. म्हणूनच काल हा जीआर मागे घेतला. काल देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेत होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तिथं नव्हते. नाहीतर अजित पवार यांनी तिथंच त्यांना उत्तर दिलं असतं, असं रोहित पवार म्हणालेत.
14 मार्च 2023 ला जीआर शिंदे सरकारने काढला होता. सगळे जीआर त्यांच्याच सरकारने काढले होते. शिंदे सरकार आणि भाजप खोटं बोलत आहेत. सगळे पद कंत्राट भारतीने भरण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला होता. आम्ही काढेलला जीआर हा काही मर्यादित पदांसाठी होता. तुम्ही 2014 मध्ये सत्तेत आला तेव्हा रद्द का केला नाही? 1998 मध्ये पहिला जीआर निघाला तेव्हा राज्यात कुणाचं सरकार होतं? तुम्ही आमच्या मोठ्या नेत्यांना माफी मागायला सांगतात. तुम्ही1998 चा जीआर वाचा भाजपच्या लोकांनी आमच्या नेत्याची माफी मागावी. भाजपच्या नेत्यांनी माफी मागत नाक घासावं, अशी आक्रमक भूमिका रोहित पवार यांनी घेतली आहे.
नव्या नोकरभरतीसाठी आदेश काढा. अडीच लाख पद रिक्त आहेत ती भरा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. सगळा महाराष्ट्र भिकारी झाला तरी मी होणार नाही, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले होते. एवढा अहंकार या मंत्र्यांना आहे, असा घणाघातही रोहित पवार यांनी केला आहे.