पुणे | 23 सप्टेंबर 2023 : बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि दुसरी म्हणजे शरद पवारसाहेबांची राष्ट्रवादी… मराठी पक्षांच्या आणि मराठी माणसाच्या विरोधात कट कारस्थान करण्याचं काम भाजप करत आहे, असं गंभीर आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. आमची लढाई वैयक्तिक नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दादा आणि मी बिलकुल नाही. हा पक्ष असंख्य कार्यकर्त्यांनी उभा केला आहे. माझं दादावरचं प्रेम आयुष्यभर कमी होणार नाही. पण ही लढाई आता वैयक्तिक नसून ती पक्षाची आणि विचारधारेची लढाई आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.
मी देवाकडे कधीच काही मागत नाही, मी देवाचे फक्त आभार मानते. पण आज महाराष्ट्रात आणि देशात पाऊस खूप कमी प्रमाणात झाला आहे. महाराष्ट्रात आणि देशात चांगला पाऊस पडू दे, असं देवाला साकड घातलं आहे. संकटात आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे हीच मनातली इच्छा देशात महागाई बेरोजगारी अत्याचार वाढत चालले आहेत ते कमी होऊ दे. भाजपच्या खासदारांनी संसदेत जी भाषा वापरून शिवीगाळ केली ते दुर्दैवी आहे. राज्यातील दुष्काळाची परिस्थिती दूर होऊ दे. राज्य आणि केंद्र सरकारला सुबुद्धी लाभू दे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांचा आज पुणे शहराच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळे शहरभरातील गणेश मंडळांना भेटी देणार आहेत. शहरातील मानांच्या गणपती मंडळासह एकूण 28 गणेश मंडळांना सुप्रिया सुळे भेट देणार आहेत. गणरायाचं दर्शन घेत आरती केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दीपक मानकर यांच्या गणेश मंडळाला भेट देणं सुप्रिया सुळे यांनी टाळलं. आजच्या दौऱ्यात मानकर यांच्या भोलेनाथ गणेश मंडळाला भेट देत सुप्रिया सुळे आरती करणार होत्या. नियोजित दौरा असून देखील सुप्रिया सुळे यांनी मानकर यांच्या मंडळाला भेट देणं टाळलं. दीपक मानकर हे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष असून भोलेनाथ गणेश मंडळाचे देखील अध्यक्ष आहेत. सुप्रिया सुळे आज दिवसभर पुण्यात गणेश मंडळांना भेटी देत दर्शन घेणार आहेत याच दौऱ्यात त्या दीपक मानकर यांच्या मंडळातील भेट देणार होत्या. मात्र त्यांनी ते टाळलं.