पुणे : राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले…, असं म्हणतात. पण देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं की, बोले तैसे न चाले त्याचे नाव देवेंद्र फडणवीस!, असं म्हणावं वाटतं, असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर 2019 ला एकदा राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता 2023 मध्येही भाजपने राष्ट्रवादीतील अजित पवार गटासोबत युती केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा त्या मुलाखतीतील व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्याचाच संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. आशा छोट्या आणि चिल्लर लोकांवर मी बोलणार नाही, असं त्या म्हणाल्यात.
भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा एक कथित अश्लिल व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
चांगली चर्चा करावी असा तो व्हीडीओ नाहीये. प्रत्येक व्यक्तीबद्दल काहीही बोललं की त्याचा हा असा परिणाम होतो. अनेकांचं वस्त्रहरण करणाऱ्याचं त्याच स्वत:चं वस्त्रहरण झालं आहे, असं त्या म्हणाल्या आहेत.
40 महिलांची फसवणूक करण्यात आली आहे. ईडी सीबीआय चौकशी लावण्याच्या धमकी देत अधिकाऱ्यांच्या घरातील महिलांतंही शोषण करण्यात आलंय. 30-35 व्हीडीओ समोर आले आहेत. तीन साडे तीन तासाचे हे व्हीडिओ आहेत. भाजपमध्ये पद देतो. घटस्फोट करून देतो अस सांगून महिलांची फसवणूक करण्यात आली आहे, असे गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केले आहेत.
महिलांची माहिती गोपनीयता ठेवली पाहिजे. किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच आहे. भाजपने अनेक गोष्टी लपवल्या, जिरवल्या… पण आता भाजपनेच हा व्हीडीओ वायरल केला आहे. अनेक अस्वच्छ लोक घेतले त्यांच्यावर आरोप करणारा माणूसच अस्वच्छ आहे हे त्यांनी दाखवलं आहे, असं त्या म्हणाल्यात.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करतील का? असा प्रश्न आहे. याअगोदर त्यांच्याकडे अनेक जणांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे. पण त्यांनी काहीही केलं नाही. किरीट सोमय्या यांची उपयुक्तता भाजपसाठी संपली आहे. भाजपला त्यांना डॅमेज करून सोडून द्यायचं आहे. प्रदीप कुरुलकर बाबत काय झालं? भाजपने मौन बाळगलं. पण भाजपच्या परवानगी शिवाय हे व्हीडीओ बाहेर आले, असंही त्या म्हणाल्या.