पुणे : पुण्यात सावरकरांच्या (Vinayak Damodar Savarkar) पुतळ्यासमोर माफीवीरचे फ्लेक्स लावण्यात आले होते. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल पुरावे सादर केले होते. त्यानंतर काँग्रेस (Pune Congress) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. आज सकाळी पुण्यातील सारसबाग (Sarasbaug, Pune) चौकात असलेल्या विनायक सावरकर यांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावण्यात आल्याचं निदर्शनास आलं. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हे फ्लेक्स लावण्यात आले होते. मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हे बॅनर लावण्यात आलेले.
दरम्यान, सावरकर यांच्या पुतळ्यासमोर लावण्यात आलेले हे फ्लेक्स एका व्यक्तीने येऊन हटवले. ही व्यक्ती सावरकरप्रेमी असल्याचं सांगितलं जातंय. अशा प्रकारे फ्लेक्स लावणाऱ्यांनीच माफी मागितली पाहिजे, अशी भावना या व्यक्तीने बोलून दाखवलीय. ही व्यक्ती प्रभात रोड येथील रहिवासी असल्याचं कळतंय.
राहुल गांधी यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या माफीनाम्याला घेऊन सादर केलेल्या पुराव्यांनंतर राजकारण तापलंय. काँग्रेस कार्यकर्ते सावरकरांविरोधात संताप व्यक्त करत आहेत. ठिकठिकाणी सावकरांना माफीवीर म्हणत संताप व्यक्त करण्यात आलाय. राहुल गांधी यांनी म्हटलं होतं की..
विनायक दामोदर सावरकर हे इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे आणि काँग्रेसविरोधात इंग्रजांसोबत काम करत होते.
तर दुसरीकडे सावरकरप्रेमींनी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध केलाय. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन सावरकरांबाबत पुरावे सादर केले होते. त्यानंतर देशभरात सावरकरांच्या माफीचा मुद्दा चर्चेत आलाय.
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात आहेत. नांदेड हिंगोलीनंतर आता आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा होणार आहे.
शेगावमधील सभेतही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या मुद्द्यावरुन आता सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.