पुणे : अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या लोकांनी जो निर्णय घेतलाय. तो निर्णय सर्वसामान्य लोकांना मान्य नाही. सर्वसामान्य मतदार यामुळे दुखावला गेला आहे. आपण मतदान करून चूक केली का? अशी भावना जनतेच्या मनामध्ये आहे. त्यामुळे राजकारणात येऊन चूक केली का असं मलाही वाटतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज कराडला जाणार आहेत. महाराष्ट्राचे पहिले यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेणार आहेत. मात्र त्याआधी पुण्यातील मोदी बागेच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. शिरूर तालुक्यातील पहिला कार्यकर्ता मोदी बागेत उपस्थित आहे. पुणे शहरातील पदाधिकारी मोदी बाग या शरद पवार यांच्या निवासस्थानी एकत्र येण्यास सुरूवात झाली आहे. रोहित पवारही तिथे दाखल झाले आहेत. तिथे रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
लोक आपली खुर्ची टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यातच सगळे गुंतून आहेत. जनतेच्या प्रश्नांविषयी बोललं गेलं पाहिजे पण तसं होताना दिसत नाही. त्यामुळे मनात विचार येतो की राजकारण करायचं की नाही… पण एक गोष्ट मनात कायम आहे. महाराष्ट्र लढर राहिलेला आहे. महाराष्ट्राच्या रक्तात लढणं आहे. त्यामुळे तोच विचार पुन्हा बळ देतो, असंही रोहित पवार म्हणालेत.
राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी काल भाजप-शिवसेनेच्या युतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदाची तर इतर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विविध घडामोडी घडत आहेत. आज पुण्यातील शरद पवारांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे.
अजित पवार जाणार हे वाटलं नव्हतं. मात्र भाजप राष्ट्रवादी पक्ष फोडणार हे काहीसं लक्षात आलं होतं. पण ही संघर्षाची वेळ आहे. 5 तारखेला आम्ही सर्व आमदार एकत्र येणार होतो. 5 तारखेला मुंबईला राष्ट्रवादीची बैठक शरद पवार यांनी बोलावली आहे. त्या बैठकीला आम्ही तिथे आहोत, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
राजकारणात येऊन चूक झाली का अशी भावना मनात येतेय. सध्या जे सुरू आहे ते चुकीचं आहे असं वाटतं. पण पक्ष जरी फुटला तरी आम्ही लढत राहणार आहोत, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.