पुणेः भाजप आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर कसबा पेठेत पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीत (By Election) भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. यामुळे टिळक कुटुंबियांमध्ये नाराजी असल्याचं दिसून आलंय. पुण्यातून (Pune) याचे पडसाद दिसायला सुरुवात झाली. आहे. ब्राह्मण समाजाच्या वतीने भाजपविरोधी बॅनर्स आज शहरात लागले आहेत. त्यामुळे टिळक कुटुंबीय तसेच पुण्यातील प्रसिद्ध टिळकवाडा आता भाजप विरोधी भूमिका घेणार का? काँग्रेसला पाठिंबा देणार का, असे सवाल विचारले जात आहेत.
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुतणे आणि काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी यावर प्रतिक्रिया दिली. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने मी आमच्याच पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
कसबा आणि चिंचवड पोट निवडणुकीत आज भाजप आणि काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारांचे अर्ज भरले जात आहेत. भाजपने मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना उमेदवारी नाकारून हेमंत रासणे यांना तिकिट दिलंय.
तर काँग्रेसचाही उमेदवार कोण, यावरचा सस्पेन्स अखेर संपला आहे. काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज रवींद्र धंगेकर उमेदवारी अर्ज भरतील.
भाजपने शैलेश टिळक यांना तिकिट नाकारल्यानंतर काँग्रेस नेते रोहित टिळक हे निवडणुकीत उतरणार का, असा प्रश्न विचारला जातोय. रोहित टिळक यांनी यावर स्पष्ट भूमिका मांडली. घरातल्या व्यक्तीच्या निधनानंतर मी अशी भूमिका ठेवणं योग्य नाही. मी त्यातनं पूर्णपणे बाजूला होतो.
टिळक कुटुंब म्हणून मलाही तेच वाटतंय की घरातल्याच व्यक्तीला संधी दिली असती तर उर्वरीत कामं पुढे झाली असती. टिळकवाड्यातून मी काँग्रेसच्या पाठिशी आहे.
पण भाजपने टिळक यांना तिकिट नाकारल्याने याचे पडसाद नक्की उमटणार. कसब्यातल्या मतदानात केवळ भाजपच नाही तर बहुजनदेखील आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, अशी प्रतिक्रिया रोहित टिळक यांनी दिली आहे.