पुणेः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अभिनंदनाची पोस्ट टाकली म्हणून माझी थेट हकालपट्टी केली. शिवसेनेचं (Shivsena) मुखपत्र सामनामधून बातमीही प्रकाशित झाली आणि नंतर आमच्याकडून चुकीनं हकालपट्टीची बातमी प्रकाशित झाल्याचं सांगण्यात आलं. चुकीनं हकालपट्टी होण्याएवढा मी छोटा माणूस आहे का, असा सवाल शिरूरचे माजी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांनी केला आहे. राज्यात नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक झाली. कर्तव्य म्हणून मी अभिनंदन केलं. पण पक्षाला आवडलं नाही. तीन दिवसात हकाल पट्टी केली. 15 वर्षांपासून मी पुण्यात शिवसेना रुजवतोय पण एका पोस्टमुळे शिवसेनेकडून अशी कारवाई करण्यात येतेय, याचं मोठं दुःख असल्याचं शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितलं. शिवसेनाप्रमुखांनी ज्यांच्याबरोबर मैत्री केली, त्यांनीच पक्ष संपवल्याचा आरोप पाटील यांनी केला. शिरूर येथे पाटील यांनी आज सर्व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एकनाथ शिंदे यांनी पुण्यासाठी बराच निधी दिला. त्यांना आमचा त्रास माहिती आहे, असं सांगताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, ‘ कोरोना काळात मदत व्हायची ती फक्त एकनाथ शिंदेंकडून. चाकणला 68 कोटी, मंचरला 5 कोटी, त्या दिवशी 3३ कोटी. जुन्नरला 15-16 कोटी हा सर्व निधी शिंदेंनी दिला. त्यांना आमच्या व्यथा माहीत होत्या. निवडून येताना काय त्रास होतो हे त्यांना माहीत होतं. त्यांनी समजून घेतलं. जेव्हा उठाव झाला आणि महाराष्ट्र पेटला. राजकारण ढवळून निघालं. जवळपास 40 आमदार गेले. जेव्हा 40 आमदार जातात आपण कुठे तरी चुकतोय. धोरणात काही बदल व्हायला हवा होता, पण तसं झालं नाही… असं पाटील म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचं अभिनंदनपर पोस्ट टाकल्यामुळे माझ्यासारख्या माणसाची हकालपट्टी करण्यात आल्याचं दुःख शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बोलून दाखवलं. ते म्हणाले, ‘ राज्यात नवीन मुख्यमंत्र्याची नेमणूक झाली. कर्तव्य म्हणून अभिनंदन केलं. पक्षाला आवडलं नाही. तीन दिवसात माझी हकालपट्टी केली. गेल्या 15 वर्षापासून काही नसताना मी या जिल्ह्यात काम केलं. तुम्ही एका पोस्टमुळे माझी हकालपट्टी करताय… मला बोलायचं तरी. विचारायचं तरी. मी साहेबांना फोन केला. तालुक्यातील लोक माझ्याकडे येणार होते. मी येणार होतो. पण वेळ नाही. ते म्हणाले, ‘तुम्ही पोस्ट टाकली मला वाईट वाटलं’. मी म्हणालो, ‘साहेबजी, मला त्यात चुकीचं काही वाटलं नाही. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करणं मला चुकीचं वाटत नाही’. ते म्हणाले, तुम्ही 15 वर्ष जाणार जाणार म्हणून गेला नाहीत. पण 20 वर्ष कुणी जाणार नाही याची खात्री असलेले लोक गेले. पण ठिक आहे….
शिवसेनेचं मुखपत्र असेलल्या सामना दैनिकातून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हकालपट्टीची बातमी प्रकाशित झाली. त्या दिवशीचा अनुभव सांगताना ते शिवाजीराव पाटील म्हणाले, ‘ उद्धव ठाकरेंशी बोलणं झाल्यावर सकाळी 6 वाजल्यापासून मला फोन येऊ लागले. तुमची हकालपट्टी झाली आहे. मलाच कळेना का हकालपट्टी झाली. मी फक्त सोशल मीडियावर पोस्ट टाकली अभिनंदनाची. मी साहेबांना हकालपट्टीच्या बातमीची पोस्ट टाकली. सकाळी साडेनऊ वाजता फोन आला. तीन फोन आले. चुकीने झालं. विनायक राऊत आणि अनिल परब यांचा फोन आला. चुकीने झालं सांगितलं. मी काय एवढा छोटा माणूस आहे का चुकीने व्हायला. त्यानंतर म्हटलं ठिक आहे. चुकीने तर चुकीने मग मी शिवसेना भवनात गेलो. सर्व चर्चा झाली. काय करायचं कसं करायचं ठरलं. तेव्हा आम्ही सांगितलं. आता आपण स्वबळावर लढायचं. राष्ट्रवादीची साथ सोडा. शरद पवारांनी ज्यांच्या ज्यांच्याबरोबर युती केली त्या पक्षाला संपवलं आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर नको. आपण स्वबळावर उभं राहू.