पुणे : अजित पवार यांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या बंडामागे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. अजित पवार यांनी हे बंड आपल्या मर्जीने केलं? की या बंडात शरद पवार अप्रत्यक्षपणे सहभागी आहेत? अशी चर्चा मागच्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या गावागावात पाहायला मिळत आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या आमदारानेच भाष्य केलंय. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव घेत त्यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय.
सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं असल्याचा गौप्यस्फोट आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं, असं मोठं विधानही सुनील शेळके यांनी केलं आहे.
ज्या दिवशी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्या दिवशी अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते. आधी ही बैठक प्रदेशाध्यक्षपदासाठी असल्याचं बोललं गेलं. मात्र नंतर घडलेल्या घटनाक्रमामुळे ही बैठक केवळ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी झाली नसल्याचं स्पष्ट झालं. त्यावरही सुनील शेळके यांनी भाष्य केलंय.
सुप्रिया सुळे यांच्याच उपस्थित भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं. सत्तेत जायचं हे शरद पवार यांना विचारावं असं आम्हाला वाटत नव्हतं. अजित पवार यांच्या घरी झालेल्या बैठकीत सुप्रिया सुळेदेखील होत्या. प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे, छगन भुजबळ हे नेतेही होते. ह्या नेत्यांनी सत्तेत जायचा निर्णय घेतला, असा मोठा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.
अजित पवार यांनी आम्हाला बोलवून घेतलं. त्यांनी सत्तेत जाण्याबाबत स्पष्ट सांगितलं होतं. भाजपसोबत जाण्याविषयी त्यांनी आमच्याशी चर्चा केली. राज्याच्या विकासासाठी, लोकहिताची कामं करण्यासाठी आपण सत्तेत असणं महत्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तेत राहायचं म्हणून आम्ही सह्या दिल्या, असं सुनील शेळके यांनी सांगितलं.
त्याच दिवशी दुपारी अचानक शपथविधीचा कार्यक्रम झाला. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये घटकपक्ष म्हणून राष्ट्रवादी सहभागी झाली आहे. राष्ट्रवादीत कोणताही गटातट नाही. राष्ट्रवादी पक्ष आणि राष्ट्रवादी परिवारासोबत मी आहे आणि यापुढेही असेल, असं त्यांनी यावेळी सांगितलं.