पुणे | 24 ऑगस्ट 2023 : देशभरातील विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या इंडिया आघाडीची येत्या 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेबरला बैठक होणार आहे. पण या बैठकीच्या सहा दिवसआधी सुप्रिया सुळे यांनी बॉम्ब फोडला आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत त्यांनी मोठं विधान केलंय. राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. राज्यात एक उपुख्यमंत्री भाजपचे आहेत. दुसरे कुठले आहेत? कुठल्या पक्षाचे आहेत? मला माहिती नाही, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. इंडिया आघाडीच्या बैठकीआधी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या या वक्तव्याला विशेष महत्व आहे.
आमचा पक्ष अजून एकच आहे. पक्ष फुटलेला नाही. एक गट सतेत्त आहे. तर एक गट विरोधी पक्षात आहे. अजित पवार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पाहत आहोत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पुण्यात भेट झाली. उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या घरात ही बैठक झाली. ही गुप्त भेट असल्याचं बोललं गेलं. त्यावर आम्ही गुप्त बैठक करत नाही. चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक का होईल?, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ऑपरेशन लोटसवर भाष्य केलं. भाजपने तीनवेळा राष्ट्रवादी पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला, असा मोठा गोप्यस्फोट केला. त्यावर माध्यमांसी बोलताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं. अनेकवेळा राष्ट्रवादीला फोडण्याचे प्रयत्न झाले. पण त्यांना अपयश आलं.यावेळी मात्र भाजपला ते शक्य झालं. त्यांना काहीही करुन सत्तेत यायचं आहे. साम दाम दंड भेद असं स्वत: देवेंद्र फडणवीस यांनीही म्हटलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य केलं. शरद पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला नाही, असं ते म्हणाले. या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलंय. शरद पवार चार वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून पवारसाहेबांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढवली नाही. इंडिया आघडीतले सगळे लोक आजही पवार साहेबाना नेता मानतात. आमचे आमदार पवारांच्याच नेतृत्वात निवडून येतात. अनेकवेळा आमचा पक्ष राज्यात एक नंबरला होता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.