पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची काल टीव्ही 9 मराठीवर मुलाखत प्रसिद्ध झाली. या मुलाखतीत त्यांनी शरद पवार यांची भूमिका आणि राष्ट्रवादी पक्षाबाबत मोठे खुलासे केले. या वक्तव्यांबाबत आता सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला आहे. छगन भुजबळ यांनी पहाटेचा शपथविधी आणि आता झालेला 2 जूनचा शपथविधी शरद पवारांना अंधारात ठेवून घेतलेले आहेत. हे छगन भुजबळ यांनी स्वत:च कबूल केलं आहे. शरद पवारसाहेबांना अंधारात शपथ घेतली गेली. हे कालच्या मुलाखतीतून समोर आलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
छगन भुजबळ यांची टीव्ही 9 मराठीवर काल मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी 2019 आणि 2023 च्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयावर भाष्य केलंय. 2019 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजपची सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती. मंत्रिपदापासून खाते वाटपापर्यंतची सगळ्यावर बोलणी झाली होती. शिवसेनेला वगळून सरकार बनवण्याचा निर्णय झाला होता. त्यावेळी भाजपने शरद पवार यांना विचारलं आमच्यासोबत नक्की राहणार का? तेव्हा शरद पवार यांनी त्यांनी होकार दिला होता. पण नंतर पवारांनी माघार घेतली. पण अजितदादांनी शब्द दिला होता. त्यांनी तो शब्द पाळला. म्हणून ते भाजपसोबत गेले. त्यांनी पहाटेची शपथ घेतली, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. काल टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत.
छगन भुजबळ यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत शरद पवार यांच्या राजकीय निर्णयांवर भाष्य केलं. यात त्यांनी वारंवार शरद पवार आणि भाजपची एकत्र येण्याची चर्चा झाली. मात्र नंतर शरद पवार यांनी माघार घेतली, असं भुजबळ म्हणाले. त्यावर विचारधारा वगैरे काही असतं की नाही? आम्ही पॉलिसी मेकर आहोत. आम्ही जनतेसाठी काम करतो. शरद पवार साहेबांनी त्यांच्या विचारधारेला कधीही सोडलं नाही. काँग्रेसचा विचार सोडणार नसल्याचं त्यांनी वारंवार सांगितलं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी छगन भुजबळांचे सगळे दावे फेटाळले आहेत. आम्ही आमची विचारधारा सोडणार नाही. काँग्रेसच्या विचारधारेशी प्रतारणा करणार नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात.