पुणे | 24 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने आता बारामती लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा होत आहे. अशातच आता येत्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. याबाबत प्रश्न विचारला असता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बारामती लोकसभा निवडणुकीत कुणीही उमेदवार असेल तरी त्याचं स्वागतच आहे. आपल्या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीत कुणीही निवडणूक लढवू शकतं, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
नव्या संसदभवनात आता प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली आहे. तिथे काम करण्याचा अनुभव कसा होता? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं आहे. आम्हाला नवीन संसद भावनात खूप जास्त अपेक्षा होत्या. अपेक्षा अशी होती की, धोरणात्मक निर्णय होतील. आम्ही मनापासून महिला धोरणाचे स्वागत करतो. धोरणाची अंमलबाजवणी कधी होणार आहे याची तारीख आलेली नाहीये. पोस्ट डेटेड चेक दिला आहे. नाव आमचे आहे पण त्यावर तारीख नाहीये, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
आरक्षण देण्यासंदर्भात ट्रिपल इंजिन सरकार चाल ढकल करत आहे. आरक्षणासंदर्भात सरकार चर्चेला तयार नाही. दुष्काळाची स्थिती चिंताजनक आहे. अनेक दिवसांपासून मागणी करूनही देखील सरकार दुर्लक्ष करतं आहे. महागाई, बेरोजगारी अशा अनेक बाबींवर सरकार अपयशी ठरत आहे. जालन्यात पोलिसांनी केलेल्या लाठीमारावरून राज्यात लोकशाही नव्हे तर दडपशाही सुरू आहे, हे लक्षात येतं. राजकीय व्यक्तींना तारखा आणि बातम्या कशा समजतात. यावर निवडणूक आयोगाने सरकारवर शंका व्यक्त केली, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मतदारसंघात गणपतीच्या दर्शनाला आली आहे. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळू दे,गणरायाला साकडं घालते. देश आणि महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा हेच गणपतीला साकडं घालते आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
ट्रिपल इंजिन सरकार अपयशी होत आहे. अनेक ठिकाणी आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहेत. त्यांच्याशी कुणी चर्चेला जात नाही. दुष्काळ जाहीर करा, मागणी करत आहेत. त्याकडे कुणाचं लक्ष नाहीये. महागाई, बेरोजगारी वाढत आहे. नागपूरला काल काही लोक दगावले. नागपूरचा विकास करतात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे आहेत. एवढा पूर आला कसा? याचे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.