दिल्ली : पंजाबचे (CM Bhgwant Man) मुख्यमंत्री भगवंत मान हे अबोल असले तरी सातत्याने चर्चेत राहिलेले आहेत. यापूर्वीही सभागृहातच ते (Drunk) मद्यधुंद होऊन आल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. आताही चर्चेत येण्याचे कारणही तेच आहे. भगवंत मान हे नुकतेच (Germany) जर्मनीला गेले होते. त्यांना लुफ्तान्सा एअरलाइन्समधून उतरविण्यात आल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल यांनी केला आहे. मुख्यमंत्री मान यांना एका जागी उभेही राहता येत नव्हते. शिवाय त्यांच्या या कृत्यामुळे विमानाला तब्बल 4 तास उशिर झाल्याचा दावा बादल यांनी केला आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे काही दिवसांपूर्वी जर्मनीला गेले होते. दरम्यान, लुफ्तान्सा एअरलाइन्समधून त्यांना खाली उतरवण्यात आले होते. यामागचे नेमके कारण काय याबाबत मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत बादल यांनी ते मद्यधुंद असल्याचे सांगितले आहे.
सुखबीरसिंग बादल यांच्या दाव्यानुसार हा प्रकार जर्मनी येथे झालेला आहे. मान यांना अशाप्रकारे विमानातून उतरवणे म्हणजे अपमानास्पद आहे. त्यांच्या या कृत्यामुळे पंजाबकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलू शकतो. यावरुन आता पंजाब सरकार विरोधात आवाज उठवला जात आहे.
मुख्यमंत्र्याच्या अशा कृत्यानंतरही पंजाब सरकारकडून काही बोलले जात नाही. याबाबत सरकार मौन बाळगून आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे आणि असे झाले असेल तर हा मुद्दा जर्मन समकक्षांकडे नेला पाहिजे असेही मत बादल यांनी व्यक्त केले आहे.
शिरोमणी अकाली दलाचे सुखबीरसिंग बादल यांच्या आरोपानंतर आता इतर पक्षांकडूनही आपवर सवाल उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या अशा वागण्यामुळे राज्याची प्रतिमा मलीन होईल, त्यामुळे ठोस पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.
तर दुसरीकडे पंजाबचे विरोधी पक्षनेते प्रतापसिंग बाजवा यांनी याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अहवालाचा हवाला देत त्यांनी म्हटले आहे की, फ्रँकफर्टमध्ये मान यांना उतरविण्यात आले होते. ते प्रवास करण्याच्या स्थितीमध्ये नव्हते. आता याचे कारणही जाहीर करावे अशी मागणी आहे.
मान यांच्या कृत्यानंतर आता भाजपानेही आरोप करण्यास सुरवात केली आहे. मान यांनी परदेशात नव्हे तर देशात दारु पिणार नाही असे आश्वासन दिल्याचे सांगत भाजपाचे खा. परवेश वर्मा यांनी बोचरी टीका केली आहे.
मात्र, मुख्यमंत्री हे वेळेनुसार दिल्लीमध्ये परतले आहेत. विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप हे बिनबुडाचे असून त्यामध्ये काही तथ्य नसल्याचे आपचे प्रवक्ते मालविंदरसिंग कांग यांनी सांगितले आहे. मान हे 18 सप्टेंबर रोजी जर्मनीहून निघाले आणि 19 सप्टेंबरला दिल्लीत पोहचले असल्याचे ते म्हणाले आहेत.
तर फ्रँकफर्टहून दिल्लीला जाणारे विमान हे बदलले गेल्याने त्याला उशिर झाल्याचे लुफ्तांसा एअरलाइन्सने सांगितले आहे. तर इतर कोणतीही माहिती देण्यास कंपनीने टाळाटाळ केली.