पुणे: सुजय विखे पाटील यांच्या भाजपप्रवेशानंतर काँग्रेस नेते आणि राज्याचे विरोधी पक्षेनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरील दबाव वाढत आहे. त्यामुळेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी येत्या दोन ते तीन दिवसात माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचं जाहीर केलं.
इतकंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करतात, असं प्रत्युत्तर विखे पाटलांनी पवारांना दिलं. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? असा सवाल शरद पवारांनी केला होता. त्याला विखेंनी हे उत्तर दिलं.
शरद पवारांनी माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. पवार आपल्या नातवाचा हट्ट पुरवण्यासाठी राजकारण करत आहेत, असं विखे म्हणाले. शिवाय माझ्या राजीनाम्याची घाई मीडियाला झालीय, मीडियाला मी काँग्रेसमध्ये नकोय का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
तसंच सध्या सुजय घराघरात पोहोचला आहे, त्याच्यानंतर मग मी आहे, असंही विखे पाटील म्हणाले.
वाचा – पार्था, लोकांमध्ये जाऊन कामं कर, रोहितचा पार्थ पवारांना सल्ला
शरद पवार काय म्हणाले?
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखेंच्या भाजप प्रवेशावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा, असा सवाल करत शरद पवारांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधलाय.
एक व्यक्ती अमूकच जागेसाठी अडून राहतो. तो हट्ट पुरविण्याची जबाबदारी इतरांची नाही. त्यांच्या वडिलांनी त्यांचा हट्ट पुरविला. त्यांना दुसऱ्या पक्षात जाण्याची मुभा दिली. सुजय विखे पाटील हे राज्यातील प्रॉमिसिंग लिडर होते का? असा सवालही शरद पवार यांनी केला.
सुजय विखे भाजपमध्ये
काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 12 मार्चला भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, नगरचे पालकमंत्री राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत सुजय विखेंचा भाजपमध्ये प्रवेश झाला. यावेळी सुजय विखेंच्या पत्नी धनश्री विखे पाटीलही हजर होत्या.
“मुख्यमंत्र्यांनी मला प्रचंड आदर दिला, वडिलांच्या निर्णयाविरुद्ध जाऊन मी भाजप प्रवेश केला. नगरमध्ये भाजप वाढवण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन. नगरमधील जागा युतीच्या असतील” असे यावेळी सुजय विखे म्हणाले.
संबंधित बातम्या
बाळासाहेब विखे विरुद्ध शरद पवार यांच्यातला वाद नेमका काय आहे?
माझ्या घरातील मुलाचा हट्ट मी पुरवू शकतो, पण इतरांच्या मुलाचा हट्ट मी का पुरवावा? शरद पवार
राष्ट्रवादीमुळे सुजय विखेंना काँग्रेस सोडावी लागल्याची अशोक चव्हाणांना खंत
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे दिग्गज आठवडाभरात भाजपात असतील : गिरीश महाजन