संगमनेर : भाजप (BJP) नेते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. किमान समान कार्यक्रमात फक्त वसुलीच झाली बाकी काहीच झाले नाही. या सरकारने मराठा समाजाचे आरक्षण घालवले, ओबीसीचे राजकीय आरक्षणही घालवले. महाराष्ट्राने एवढं भ्रष्टाचारी सरकार कधी पाहिलं नव्हतं असा घणाघात राधाकृष्ण विखे पाटलांनी केला आहे. पुढे बोलताना विखे पाटलांनी म्हटलं की गेल्या अडीच वर्षात काहीही झालं तरी महाविकास आघाडी सरकारकडून केंद्राकडे बोट दाखवलं जात होतं. मग मविआचे मंत्री काय करत होते भजे तळत होते का? असा खोचक टोला देखील यावेळी विखे पाटलांनी लगावला आहे. तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थ शत-प्रतिशत भाजपच जिंकेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान यावेळी विखे पाटलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील जोरदार निशाणा साधला आहे. माझे कुटुंब तूमची जबाबदारी म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच निळवंडे धरणाचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांचंच आहे. त्याचे श्रेय दुसरे कोणीही घेण्याचा प्रयत्न करू नये. उजवा आणि डाव्या कालव्यात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही म्हणत त्यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना देखील टोला लगावला आहे. पूर्वी आपण पारंतत्र्यात होतो अशी तालुक्यातील जनतेची भावना झाली होती. मात्र आता त्यांना स्वातंत्र्य मिळाल्या सारखे वाटत आहे असं देखील विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना महसूल मंत्री विखे पाटलांनी वाळू माफियांना देखील इशारा दिला आहे. वाळू माफियांना सोडणार नाही. वाळू माफीयांचा माज उतरवणार. वाळू माफियांवर कडक कारवाई करणार, त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नवीन धोरण तयार करणार, असा इशारा यावेळी राधाकृष्ण विखे पाटलांनी दिला आहे. त्यामुळे आता पुढील काळात वाळूच्या तस्करीवर चाप लागण्याची शक्यता आहे.