अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी इस्लामपुरात केलेल्या वक्तव्यामुळे ब्राम्हण समाज चांगलाच आक्रमक झालाय. पुण्यासह राज्यातील विविध भागात ब्राम्हण समाजाकडून (Brahmin Community) आंदोलन करण्यात आलं. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर आता सर्व स्तरातून टीका होतेय. भाजप नेत्यांकडूनही मिटकरींवर टीका सुरु आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radha Krishna Vikhe Patil) यांनीही अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसनं बेताल वक्तव्य करण्यासाठी काही माणसं तयारी केली आहेत. एकाने मारल्यासारखं करायचं आणि दुसऱ्याने माफी मागायची, असं राष्ट्रवादीचं दुहेरी धोरण आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केलीय.
अमोल मिटकरींच्या वक्तव्यावर बोलताना विखे-पाटील म्हणाले की, एखाद्या समाजाबाबत अशा प्रकारे वक्तव्य करणं योग्य नाही. राष्ट्रवादीची भूमिकाच बेताल वक्तव्य करण्याची, धर्मासंदर्भात मुक्ताफळं उधळण्याची, अंगावर बाजू आली की माफी मागायची, अशीच त्यांची भूमिका राहिली आहे. सांगलीत झालेल्या कार्यक्रमात वक्तव्य केल्यामुळे जयंत पाटलांनी माफी मागितली. मिटकरींनी माफी मागितली पाहिजे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे पक्षाने त्यांनी कारणे दाखवा नोटीस काढायला हवी. राष्ट्रवादीने बेताल वक्तव्य करण्यासाठी काही माणसंच तयार केली आहेत. एकाने मारल्यासारखं करायचं आणि एकाने माफी मागायची, असं दुहेरी धोरण राष्ट्रवादीचं आहे, अशा शब्दात विखे-पाटलांनी टीका केलीय.
त्याचबरोबर विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवरही घणाघात केलाय. राज्यभर पोलखोल यात्रा निघतील. सरकारच्या भ्रष्टाचाराची लख्तरं दररोज टांगली जात आहेत. भ्रष्टाचाराची पोलखोल होणार असल्यानंच शिवसेनेकडून पोलखोल यात्रेवर हल्ला करण्यात आलाय. मात्र हल्ले करुन मुस्कटदाबी होणार नाही. तोंड दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. तुमची पळताभुई थोडी करुन सोडू, असा इशाराच विखे पाटील यांनी सरकारला दिलाय.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीच्या मुद्द्यावरुनही विखे पाटलांनी सरकारवर टीका केली. आघाडी सरकारचा प्रत्येक निर्णय काहीतरी हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतला जातो. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर सरकार गप्प का? दीपक पांडे यांनी थेट मंत्रालयाकडे अंगुलीनिर्देश केलाय. सरकारने या प्रकरणाची चौकशी करावी. बदली करुन सरकारला भ्रष्टाचार झाकला जाईल असं वाटत असेल. पण त्यांचा हा गैरसमज आहे. या प्रकरणी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असल्याचंही विखे पाटील म्हणाले.
इतर बातम्या :