मुंबई : शिवसेनेनंतर (Shiv sena) आता राष्ट्रवादी (NCP) फोडण्याचा भाजपाचा (BJP) डाव आहे. असं वक्तव्य राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी केलं होतं. रोहित पवार यांच्या या वक्तव्यावरून राजकारण चांगलचं तापलं आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकोंमकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खोचक टोला लगावला आहे. राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न हे वक्तव्य रोहित पवार यांनी प्रसिद्धीसाठी केल्याचं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेनंतर आता भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं होतं. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारले असता, यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी रोहित पवार यांना टोला लगावला आहे. त्यांनी हे वक्तव्य प्रसिद्धीसाठी केलं आहे. त्यांचे घर फोडायला इथे कुणालाही वेळ नाही. गेल्या अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्याचं जे काही नुकसान झालं आहे, ते आम्हाला भरून काढायचं आहे. आम्हाला राज्याची घरी पुन्हा बसवायची आहे. त्यामुळे आम्हाला कोणाचे घर फोडायला वेळ नसल्याचं म्हणत त्यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.
दरम्यान याच वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. देशभरात जेवढे प्रादेशिक पक्ष आहेत, त्या सर्वांचे अस्तित्व भाजपाला मिटवायचे आहे. मात्र राष्ट्रवादी पक्ष फोडण्यासाठी भाजपाला दहा जन्म घ्यावे लागतील. तरी देखील राष्ट्रवादी पक्ष फुटणार नाही, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.