नवी दिल्ली : चौकीदार चोर है’च्या घोषणे’ने रान उठवणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात खेद व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उत्साहाच्या भरात आपण हे वक्तव्य केल्याचं राहुल गांधी म्हणाले. राफेल लढाऊ विमान खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप करत, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संबोधून ‘चौकीदार चोर है’ची घोषणा दिली होती. पुढे हीच घोषणा काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर गाजवली. सुप्रीम कोर्टात यावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.
सुप्रीम कोर्टानेही मान्य केलं की चौकीदार चोर है, असं वक्तव्य राहुल गांधींनी माध्यामांसमोर केले होते. यामुळे भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल राहुल गांधींनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.
राहुल गांधी यांनी ‘चौकीदार चोर है’ म्हटल्यामुळे सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली होती आणि 22 एप्रिलपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले होते. सरन्यायाधीश रंजन गोगोईंच्या खंडपीठात सुनावणी दरम्यान कोर्टाने आपली बाजू मांडताना म्हटलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात कोर्टाने कोणतेही वक्तव्य केलेलं नाही. राहुल गांधी यांनी कोर्टाचे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने माध्यमांसमोर मांडलं.”