पुणे : प्रश्न विचारायला हवेत, काही प्रश्नांना उत्तरं देताना अडचणी येतील, काही प्रश्नांची उत्तरं नसतील, मात्र प्रश्नांना सामोरं जायला हवं, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रश्नांना सामोरं का जात नाहीत? असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यात सवाल उपस्थित केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यातील भारती विद्यापीठात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. राजकीय विषयांसह वैयक्तिक विषयांवरही राहुल गांधी यांनी यावेळी मनमोकळा संवाद साधला. अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. निवडक विद्यार्थ्यांनी थेट राहुल गांधी यांना प्रश्न विचारले.
या कार्यक्रमाला काँग्रेस नेते सॅम पित्रोदा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांसह काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते.
हजारो लोकांशी चर्चा करुन जाहीरनामा तयार : राहुल गांधी
काँग्रेसने अत्यंत विचारपूर्वक जाहीरनामा तयार केला आहे. जाहीरनाम्यासाठी हजारो लोकांशी चर्चा केली आहे, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी राहुल गांधी यांनी भारतातील रोजगाराची परिस्थितीही मांडली. आजच्या घडीला प्रत्येक 24 तासाला 27 हजार जणांच्या नोकऱ्या जात आहेत, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचे वय किती असावे? राहुल म्हणतात…
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एक विद्यार्थ्याने राहुल यांना प्रश्न विचारला की, “राजकारणात निवृत्ती असावी का? आणि असली तर किती वय असावे?” या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी विद्यार्थ्यांनाच प्रतिप्रश्न केला आणि म्हणाले, “तुम्हाला काय वाटतं, राजकीय नेत्यांच्या नेवृत्तीचं वय किती असावं?”
त्यानंतर विद्यार्थ्यांकडून वेगवेगळी उत्तरं आली. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, “मला वाटतं राजकारणात निवृत्ती असावी आणि 60 वर्षे हे राजकीय नेत्यांच्या निवृत्तीचं वय असावं.”
LIVE UPDATE :
सध्या देशात लोकसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि उमेदवार विदर्भात प्रचार करताना दिसत आहेत. महाराष्ट्रात काँग्रेसच्या प्रचाराला गुरुवारपासून सुरुवात झाली. राहुल गांधी आज सकाळी 11 वाजता पुण्यातील मगरपट्टा सिटीत लक्ष्मी लॉन येथे विद्यार्थ्यांशी बोलतील. त्यानंतर दुपारी 2.30 वाजता ते चंद्रपूर येथे जाहीर सभा घेतील. शेवटी सायंकाळी 4.30 वाजता वर्धा येथे प्रचारसभेला संबोधित करतील. या कार्यक्रमासह राहुल गांधींचा 2 दिवसीय महाराष्ट्र दौरा संपेल.
विशेष म्हणजे वर्ध्यात होणारी राहुल गांधींची सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेतलेल्या मैदानावरच होणार आहे. वर्ध्यात काँग्रेसकडून चारुलता टोकस तर भाजपाकडून विद्यमान खासदास रामदास तडस निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 मध्ये निवडणुकीत काँग्रेसने विदर्भातील सर्व जागा गमावल्या होत्या. यंदाची निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. गेल्या महिन्यात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीही राहुल गांधी यांनी महाराष्ट्र दौरा केला होता.
पाहा व्हिडीओ: