भुवनेश्वर : देशातील सर्वात मोठ्या राजकीय कुटुंबातील आणखी एका सदस्याची राजकारणात एंट्री झाली आहे. प्रियांका गांधी यांना पक्षाचं महासचिवपद देण्यात आलंय. प्रियांका यांच्यानंतर आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे चुलत भाऊ आणि भाजप खासदार वरुण गांधीही काँग्रेसमध्ये येतील, असा अंदाज लावला जातोय. या अंदाजांवर राहुल गांधी यांनी स्वतःच उत्तर दिलंय.
ओदिशातील भुवनेश्वरमध्ये एका कार्यक्रमात राहुल गांधींना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. पण या प्रकारच्या चर्चा मी ऐकलेल्या नाहीत, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. प्रचारसभेनिमित्त राहुल गांधी भुवनेश्वर दौऱ्यावर आहेत. राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद सांभाळल्यापासूनच अंदाज लावला जात होता, की त्यांचा भाऊ वरुण गांधी यांचाही लवकरच काँग्रेस प्रवेश होईल. प्रियांका गांधींच्या एंट्रीनंतर हा चर्चांना आणखी उत गेला.
वरुण गांधी भाजपात असले तरी त्यांचं मन या पक्षात रमत नसल्याचं दिसतं. रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा असो, किंवा खासदारांच्या वेतनवाढीचा. वरुण गांधी यांनी जाहीरपणे भाजपविरोधी वक्तव्य केली आहेत. त्यामुळे भाजपापासून ते दूर गेल्याचं दिसतंय.
वरुण गांधींची नाराजी कशामुळे?
वरुण गांधी यांनी भाजपविरोधी वक्तव्य केली असली तरी काँग्रेसविरोधातही ते कधी बोललेले नाहीत. सोनिय गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर ते कधीही टीका करत नाहीत. भाजपने आपल्या आईचा सन्मानच केलाय, त्यामुळे पक्ष सोडण्याचा प्रश्न नाही, असंही ते काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
2013 मध्ये वरुण गांधी यांना भाजपच्या इतिहासात सर्वात कमी वयात महासचिव आणि पश्चिम बंगालचा प्रभारी बनवण्यात आलं होतं. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर एक एक करुन सर्व पदं त्यांच्याकडून काढून घेण्यात आली. विशेष म्हणजे पक्षविरोधी वक्तव्य करुन पक्षाच्या अडचणी वाढवू नका अशी नोटीसही त्यांना पाठवण्याची पक्षावर वेळ आली.
1980 मध्ये इंदिरा गांधी यांचे छोटे चिरंजीव संजय गांधी यांचा एका विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी मेनका गांधी यांनी काँग्रेसपासून दूर राहणंच पसंत केलं. 1988 मध्ये त्यांनी जनता दलमध्ये प्रवेश केला. पण 2004 मध्ये त्यांनी भाजपचा झेंडा हातात घेतला.
वरुण गांधी यांनीही 2004 मध्येच भाजपात प्रवेश केला आणि 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला. पण यावेळी त्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याचं बोललं जातंय. वरुण गांधी यांची एक लोकप्रिय नेता म्हणून ओळख आहे. शिवाय ते त्यांच्या कडक भाषणांसाठीही ओळखले जातात.